मराठवाड्यातील धरणांत पाणीसाठा १२ टक्क्यांवर; जलप्रकल्पांना प्रतीक्षा चांगल्या पावसाची
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 06:00 AM2018-07-03T06:00:00+5:302018-07-03T06:00:00+5:30
मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना जिल्हा वगळता अन्य जिल्ह्यांत पावसाने चांगली हजेरी लावली; परंतु काही दिवसांचा अपवाद वगळता जून महिना कोरडाच गेलो. परिणामी, महिनाभरात मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठा ११.८७ वरून केवळ १२ टक्क्यांवर गेला आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना जिल्हा वगळता अन्य जिल्ह्यांत पावसाने चांगली हजेरी लावली; परंतु काही दिवसांचा अपवाद वगळता जून महिना कोरडाच गेलो. परिणामी, महिनाभरात मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठा ११.८७ वरून केवळ १२ टक्क्यांवर गेला आहे. काही प्रकल्पांनी ऐन पावसाळ्यात तळ गाठला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत चांगला पाऊस न पडल्यास अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात जून महिन्याच्या सुरुवातीला आणि मध्यात चांगली हजेरी लावली. औरंगाबाद, जालना जिल्हा वगळता सर्व ठिकाणी पावसाने जूनमधील सरासरी गाठली. पेरणीची कामे सुरू असली तरी चांगल्या, सातत्यपूर्ण, सर्वदूर पावसाची गरज आहे. सध्या अधूनमधून तुरळक पाऊस होत आहे. मोठा आणि सातत्यपूर्ण पावसाची प्रतीक्षा करण्याची वेळ आहे. याचा परिणाम मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठ्यावर होत आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये ११ जून रोजी २३२७.२९ दशलक्ष घनमीटर इतका साठा होता. महिनाभरात तीन धरणांमुळे त्यात किरकोळ वाढ झाली. सध्या एकूण २३३८.१७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. जूनच्या सुरुवातील मांजरा धरणात ८.२३ टक्के जलसाठा होता. जुलै महिना येईपर्यंत पाणीसाठ्यात मोठी घट झाली असून सध्या ६.८५ टक्के पाणीसाठा उरला आहे.
‘जायकवाडी’त झपाट्याने घट
जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. या धरणामध्ये ५ जून रोजी १२६६.१०२ दशलक्ष घनमीटर म्हणजे २४.३२ टक्के पाणीसाठा होता. ११ जून रोजी हाच पाणीसाठा १२४६.४२ दलघमी (२३.४१ टक्के) झाला. २ जुलै रोजी हा पाणीसाठा २०.८४ टक्के इतक झाला. सध्या ११९०.४५ दलघमी पाणीसाठा आहे. पाणीसाठ्यात घट होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
‘विष्णुपुरी’त वाढ
नांदेड येथील विष्णुपुरी जलाशयात ११ जून रोजी २९.८२ टक्के पाणीसाठा होता. जूनमध्ये नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १५४.४ टक्के पाऊस झाला. या झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात पाच टक्क्यांनी वाढ झाली. २ जुलै रोजी विष्णुपुरी जलाशयात ३४.४६ टक्क्यांवर पाणीसाठा गेला. या ठिकाणी ३०.६० दलघमी पाणीसाठा आहे.
इतर जलप्रकल्पांतील पाणीसाठा
निम्न दुधना प्रकल्पात १३८.८५ दलघमी (१४.९७ टक्के), येलदरी प्रकल्पात ११९.६६ दलघमी, सिद्धेश्वर प्रकल्पात १४३.३६ दलघमी, माजलगाव धरणात १४५.४० दलघमी (१.०९ टक्के), मांजरा धरणात ५९.२६ दलघमी (६.८५ टक्के), निम्न मनार प्रकल्पात २१.४८ दलघमी (९,२४ टक्के), निम्न तेरणा प्रकल्पात ६९.४१ दलघमी (४३.२४ टक्के), विष्णुपुरी धरणात ३०.६० दलघमी (३४.४६ टक्के), सीना कोळेगाव प्रकल्पात ६८.८६ दलघमी पाणी साठा झाला आहे.