शहरात दिवसाआड पाणीपुरवठा?

By admin | Published: April 4, 2017 01:41 AM2017-04-04T01:41:21+5:302017-04-04T01:41:21+5:30

पवना धरणात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे

Water supply in the city? | शहरात दिवसाआड पाणीपुरवठा?

शहरात दिवसाआड पाणीपुरवठा?

Next

पिंपरी : पवना धरणात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन सुरू आहे. काही दिवसांतच महिन्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात धरणातील साठा आणि पुरवठा यांचा आढावा घेण्यासाठी पाटबंधारे विभाग व महापालिकेतील नवीन महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पक्षनेते, महापालिका अधिकारी यांची लवकरच बैठक होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत पाणी सोडून रावेत येथील जलउपसा केंद्रातून हे पाणी उचलले जाते. ते पाणी महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून जलवाहिनीद्वारे शहरातील विविध भागांतील नागरिकांना पुरविले जाते. गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यातच पवना धरण १०० टक्के भरले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध पाणीयोजना, तळेगाव, उर्से, वडगाव मावळ या भागातील पाणीयोजनांना वर्षभर पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे पाटबंधारे विभागाने सूचित केले होते. पवना धरणातून वीजनिर्मिती आणि पिंपरी-चिंचवडला पिण्यासाठी दिवसाला ४५० एमएलडी पाणी सोडले जाते. पवना धरणाची एकूण क्षमता १० टीएमसी आहे.
पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, ‘‘धरणात ४५ टक्के पाणीसाठा आहे. आता उन्हाळा सुरू झाला आहे. पाणीसाठा कमी झाल्यास जलसंपदा विभागाच्या वतीने महापालिकेला सूचना केली जाते. पाणी पुरवठ्यासंदर्भात पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला जाणार आहे. महिनाभरात या संदर्भात आढावा घेण्यात येणार असून, तसेच महापालिकेतील महापौर, उपमहापौर, विविध पक्षांचे गटनेते यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
>गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाणी
पवना धरणात ४५.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच तारखेला ३३.७७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षीपेक्षा या वेळी १२ टक्के पाणीसाठा जास्त आहे. पाणीसाठा मुबलक असला, तरीही पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे यंदा एप्रिलच्या सुरुवातीला धरणात मुबलक पाणीसाठा आहे. असे असले, तरी देखील पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यावर पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना एकवेळेस पाणीपुरवठा करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.

Web Title: Water supply in the city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.