पाणीपुरवठ्यात कपात
By admin | Published: November 20, 2014 01:08 AM2014-11-20T01:08:09+5:302014-11-20T01:08:09+5:30
अर्ध्या नागपूरला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात उद्या, गुरुवारपासून कपात होण्याची शक्यता आहे. पाच दिवसांपूर्वी पेंचचा उजवा कालवा फुटल्यामुळे गोरेवाडा जलाशयातील पाण्याच्या पातळीत विक्रमी घट झाली,
गोरेवाड्याची पातळी वाढेना : दीड मीटरने कमी
नागपूर : अर्ध्या नागपूरला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात उद्या, गुरुवारपासून कपात होण्याची शक्यता आहे. पाच दिवसांपूर्वी पेंचचा उजवा कालवा फुटल्यामुळे गोरेवाडा जलाशयातील पाण्याच्या पातळीत विक्रमी घट झाली, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जलाशयात दररोजच्या गरजेपुरतेच पाणी उपलब्ध होत असल्याने येथून काही प्रमाणात कमी पंपिंग करून पाण्याची पातळी वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहे. यामुळे पुढील आठ दिवस कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
पेंचच्या उजव्या कालव्याद्वारे नागपूर शहरातील गोरेवाडा जलाशयात पाणी आणले जाते. ३१ आॅक्टोबरला पेंच नवेगाव खैरी प्रकल्पाच्या १९ कि.मी. अंतरावर राईट बॅक कॅनल पाटणसावंगीजवळ एका ठिकाणी फुटला होता. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी पुन्हा बाभुळखेडा गावाजवळ हा कालवा फुटला. दुरुस्तीसाठी सुरुवातीला तीन दिवस व नंतर तीन दिवस कालव्याद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे गोरेवाडा जलाशयातील पाण्याची पातळी ३१२.५० मीटरपर्यत खाली गेली. परिणामी गोरेवाड्यातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या पश्चिम, दक्षिण व मध्य नागपुुरातील वस्त्यांना बुधवारी काही प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. पुढील तीन-चार दिवस टंचाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. १७ नोव्हेंबर रोजी पेंचच्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र, मध्ये तीन दिवस कालव्याद्वारे येणारे पाणी बंद होते व दुसरीकडे गोरेवाडा जलाशयात असलेल्या जलसाठ्यातून पूर्ण क्षमतेने नागपूर शहराला पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे गोरेवाडा जलाशयाची पाण्याची पातळी खूप खाली गेली. येथून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी जलाशयात किमान ३१४ मीटर पातळी असणे आवश्यक आहे. पण ही पातळी तब्बल दीड मीटरने खाली गेली आहे. बुधवारी पातळी ३१२.५० मीटर होती. गुरुवारी त्यात थोडी सुधारणा होऊन ३१२.६५ मीटरपर्यंत वाढ झाली.
गोरेवाडामधून एरव्ही दररोज शहराला ४३० ते ४४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. मात्र, पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे सुमारे ४० ते ५० एमएलडी पाणी कमी पडत आहे. गोरेवाडा येथील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पुढील दोन- तीन दिवस येथून कमी पाणी पुरवठा करण्याशिवाय पर्याय नाही. गोरेवाड्यातून नेहमीपेक्षा कमी पाण्याची उचल केली व दुसरीकडे पेंचच्या कालव्याद्वारे येणारे पाणी साठवले तर दररोज सुमारे ५ सेंटिमीटरने पातळी वाढू शकते. त्यामुळे पाणी पुरवठ्यात काहीशी कपात करण्याचे नियोजन केले जात आहे. (प्रतिनिधी)
जलकुंभ भरेना, टँकरही रिकामे
गोरेवाडा जलाशयातून पंपिंग करून पाणी सेमिनरी हिल्स परिसरातील राजभवन येथील जलकुंभात आणले जाते. नंतर येथून पश्चिम, दक्षिण-पश्चिम, मध्य व दक्षिण नागपुरातील जलकुंभांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गोरेवाड्यातून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नसल्याने शहरातील जलकुंभ देखील पूर्णपणे भरले जात नाही आहेत. परिणामी जलकुंभांवरून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. जलकुंभावर असणाऱ्या हायड्रनवर टँकर भरले जातात. मात्र, नळाद्वारे पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी टँकरला देणाऱ्या पाण्यातही काहिशी कपात केली जात आहे.