जलसंपदामंत्र्यांची मोटार रोखली
By admin | Published: November 22, 2015 04:14 AM2015-11-22T04:14:57+5:302015-11-22T04:14:57+5:30
गंगापूर आणि दारणा धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या उदे्रकाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना शनिवारी सामोरे जावे लागले.
नाशिक : गंगापूर आणि दारणा धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या उदे्रकाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना शनिवारी सामोरे जावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री महाजन यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखविले; तसेच जोरदार घोषणाबाजी करत वाहन कार्यालयाबाहेर रोखले आणि त्यावर चढण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांवर लाठीमार करून पोलिसांनी त्यांना पिटाळून लावले.
काँग्रेस, सेना, राष्ट्रवादीचे आंदोलन
मराठवाड्याच्या दुष्काळ निवारणासाठी दारणा, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यापासून शहरासह जिल्ह्यात पाणीप्रश्न ‘पेटला’ आहे.
शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीप्रसंगी महाजन उपस्थित राहणार असल्याने शेतकऱ्यांसह काँगे्रस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते महाजन यांच्या निषेधासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सकाळपासूनच मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
दुपारी २च्या सुमारास पालकमंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचताच आंदोलनकर्त्यांनी ताफ्यातील महाजन यांच्या वाहनाला घेराव घातला.