लातूरमधील रुग्णालयाला मुंबईकरांकडून पाणीपुरवठा
By admin | Published: May 14, 2016 02:50 AM2016-05-14T02:50:55+5:302016-05-14T02:50:55+5:30
मराठवाड्यातील भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत सामान्यांप्रमाणेच रुग्णालयांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लातूरमध्येही अशीच परिस्थिती होती
मुंबई : मराठवाड्यातील भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत सामान्यांप्रमाणेच रुग्णालयांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लातूरमध्येही अशीच परिस्थिती होती. तेथील जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया पाण्याअभावी थांबल्या होत्या. अशा परिस्थितीत या रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्यासाठी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या १९७९ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी खारीचा वाटा उचलला आहे. त्यांच्यातर्फे रुग्णालयाला दररोज २,१०० लीटर पाणी पुरविण्यात येते. हे पाणी आरओ (रिव्हर्स आॅस्मॉसिस) प्रक्रिया करून तयार केलेले आहे.
या उपक्रमाबाबत माहिती देताना राजा शिवाजीच्या १९७९ च्या बॅचचे अजय कांबळी यांनी सांगितले, की या बॅचच्या विद्यार्थ्यांचे दरवर्षीप्रमाणे गेट टूगेदर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी दुष्काळग्रस्त भागासाठी काहीतरी करावे, असा विचार पुढे आला. कांबळी यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर गाव दत्तक घेण्याची कल्पना मांडली. त्यावेळी त्यांचे सहकारी राजेश माने यांनी लातूरमधील रुग्णालयांच्या अवस्थेविषयी सांगितले. त्यातूनच या ग्रुपने रुग्णालयाला थेट पाणीपुरवठा करण्याचे ठरवले.
यासाठी या माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून रक्कम जमा केली व थंड पाण्याचे २० लीटर पाणी भरलेले १०५ जार दररोज पुरविण्यास सुरुवात केली. १ मे रोजी सुरू करण्यात आलेली ही सेवा ३० मेपर्यंत सुरू राहणार आहे. याच पद्धतीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातही १४ मे ते ३० जून या कालावधीत कांबळी वैयक्तिक पातळीवर १५० जार पुरविणार आहेत. (प्रतिनिधी)