पाणीपुरवठा, साथीचे आजार-पालिका प्रशासन धारेवर

By admin | Published: September 24, 2016 01:04 AM2016-09-24T01:04:15+5:302016-09-24T01:04:15+5:30

शहरामध्ये वेगाने फोफावणारे डेंगी, चिकुनगुनिया हे आजार यावरून सदस्य व पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला शुक्रवारी सर्वसाधारण सभेत धारेवर धरले.

Water supply, pandemic disease-administration administration | पाणीपुरवठा, साथीचे आजार-पालिका प्रशासन धारेवर

पाणीपुरवठा, साथीचे आजार-पालिका प्रशासन धारेवर

Next


पुणे : उपनगरांमधील विस्कळीत पाणीपुरवठा व शहरामध्ये वेगाने फोफावणारे डेंगी, चिकुनगुनिया हे आजार यावरून सदस्य व पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला शुक्रवारी सर्वसाधारण सभेत धारेवर धरले. प्रशासन फक्त निविदांच्या मागे धावते आहे, नागरी हिताचे प्रश्न सोडविण्याला आयुक्तांसह कोणालाही वेळ नाही, अशी टीका या वेळी करण्यात आली.
उपनगरातील संतप्त महिला सदस्यांनी धरणे भरून वाहत आहेत, पाऊस पडतो आहे, सगळीकडे पाणी मिळत आहे, आमच्या भागात मात्र अजूनही पाण्याची टंचाईच आहे, प्रशासन काय करते आहे, अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला. साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यात पालिकेच्या आरोग्य खात्याला अपयश आले आहे, असा आरोप करीत अरविंद शिंदे यांनी मृतांवर अंत्यसंस्कार विनामूल्य करता व जिवंत माणसाला साध्या रक्ततपासणीसाठी ६०० रुपये आकारता, तुम्हाला काही वाटते का, असा सवाल केला. टेंडर एके टेंडर करणाऱ्या प्रशासनाला आता सभागृहाने जाब विचारला पाहिजे, त्यांच्या कामाबद्दलचे गोपनीय अहवाल लिहिण्याचा अधिकार ठराव करून सभागृहाकडे घ्या, अशी मागणी आबा बागूल यांनी केली. कर्णे गुरुजी यांनी वडगाव शेरी व त्या परिसरात पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नसल्याचे सांगितले. विजया वाडकर, चंचला कोंद्रे, संगीता ठोसर, कमल व्यवहारे, सुनंदा गडाळे, रोहिणी चेमटे आदी महिला सदस्यांनी फक्त उपनगरांमध्येच नाही, तर शहरातील गुरुवार, रविवार अशा पेठांमध्येही अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी पुरेसे व वेळेवर मिळत नसल्याची तक्रार केली. पाणी सोडणारे पालिकेचे कर्मचारी उर्मटपणे वागतात, ऐकत नाही, त्यांच्या मनाप्रमाणेच काम करतात, असे त्यांनी सांगितले. उपमहापौर मुकारी अलगुडे, संजय बालगुडे, अविनाश बागवे, दत्तात्रय धनकवडे, सुभाष जगताप, सुुनील गोगले, सतीश म्हस्के, राजेंद्र वागसकर, गणेश बीडकर या सदस्यांनीही पाण्याच्या वेळेबद्दल तक्रारी केल्या. आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांना उत्तर देताना याबाबत सोमवारी बैठक घेण्याचे मान्य केले. भामा आसखेड पाणी योजनेच्या कामातील अडथळे दूर झाले असून ही योजना पूर्ण झाल्यानंतर उपनगरांमध्ये पाण्याची समस्या राहणार नाही, असे ते म्हणाले.
त्यानंतर लगेचच आयुक्तांनी साथीच्या आजारांवर सदस्यांकडून झालेल्या भडिमाराला सामोरे जावे लागले. नीलिमा खाडे, पुष्पा कनोजिया, अश्विनी कदम, धनंजय जाधव आदींनी या चर्चेत भाग घेतला. महापौरांनी यासंदर्भात आयुक्तांना सोमवारीच आदेश दिले असल्याची माहिती दिली. अन्य खात्यांमधील कर्मचारीवर्ग मदतीला घेऊन शहरातील सर्व ठिकाणीे जाऊन डास निर्मूलन मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
(प्रतिनिधी)
>निवडणूक लक्षात घेऊन जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या प्रभागातील पाणीपुरवठा विस्कळीत केला जात असल्याचा आरोप दत्तात्रय धनकवडे यांनी केला. त्यांचा रोख पालिका प्रशासन भाजपाच्या तंत्राने चालत असल्याकडे होता.
शहरात डेंगी व चिकुनगुनिया या आजारांनी थैमान घातले आहे, तरीही आरोग्य विभाग काही करायला तयार नाही. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेचे प्रयत्न तोकडे पडत आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली. आरोग्य विभागाचे एक स्वतंत्र पथक शहरात सर्वत्र फिरण्यासाठी तयार करावे, अशी मागणी आबा बागूल यांनी केली.

Web Title: Water supply, pandemic disease-administration administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.