नसलेल्या ग्रा.पं.साठी पाणीपुरवठा योजना
By admin | Published: June 9, 2017 02:47 AM2017-06-09T02:47:19+5:302017-06-09T02:47:19+5:30
उपअभियंता आर.एस.माळी यांनी अस्तित्वात नसलेल्या कावाडे ग्रामपंचायतीच्या नावे एकाच कामाची दोन अंदाजपत्रके तयार केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : तालुक्यातील उमटे धरणामधील भ्रष्टाचाराचे प्रकरण ताजे असतानाच अलिबागच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता आर.एस.माळी यांनी अस्तित्वात नसलेल्या कावाडे ग्रामपंचायतीच्या नावे एकाच कामाची दोन अंदाजपत्रके तयार केली. सरकारी निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे आपले पोर्टलवरून दिली आहे.
ग्रामस्थ मच्छिंद्र पाटील यांनीही याबाबत आधी तक्रार केली होती. त्यावर काहीच कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी आर.एस.माळी यांच्याविरुध्द मधुकर ठाकूर यांनी २१ सप्टेंबर २०१६ रोजी तक्र ार करून त्यांचा पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार तत्काळ काढून घ्यावा, अशी मागणी केली होती. परंतु जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ठाकूर यांना १९ डिसेंबर २०१६ रोजी पत्र लिहून रिक्त पदे भरल्यावर माळी यांचा कार्यभार काढून घेण्यात येईल असे कळविले होते. याच माळी यांचे उमटे धरणामधील कंत्राटदाराला कामे न करता ३ कोटी रुपयांचे बिल अदा करणे, अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतींच्या नावे बिले काढणे असे पराक्र म उघडकीस आले आहेत. दीड वर्षापूर्वी तर मापगाव पाणीपुरवठा योजनेमध्ये बनावट कागदपत्रे तयार केल्याबद्दल माळी यांच्याविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. असे असतानाही खोटी बिले काढून विविध पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची पोटे भरण्यासाठी माळी यांना या ठिकाणी कार्यरत ठेवल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. त्यांच्याकडील पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार काढून न घेण्यास तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारीही जबाबदार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
कावाडे येथील शौचालयासाठी पाण्याची लाइन टाकणे, टाकी बांधणे अशा कामांसाठी अलिबाग उपविभागाने ग्रामपंचायत कावाडे जी ग्रामपंचायत अस्तित्वातच नाही तिच्या नावे प्रभारी उप अभियंता माळी यांनी पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे काम पूर्ण झाल्याचेही प्रमाणपत्र दिले आहे.
>पत्र लिहिलेली ग्रामपंचायत अस्तित्वातच नाही
बिल शेकापच्या माजी सभापती असणाऱ्या मुलाच्या नावे असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. कावाडे येथील पाणीपुरवठा योजनेबाबतच्या या पत्रावर जावक क्र मांक नाही, तारीख नाही, पत्र लिहिलेली ग्रामपंचायत अस्तित्वातच नाही. या सर्व प्रकारावरून पाणीपुरवठा विभागाचा कारभार कसा अनागोंदी चालला आहे हे सिध्द होते.
कावाडे येथील शौचालयासाठी पाण्याची लाइन टाकणे, टाकी बांधणे अशा कामांसाठी अलिबाग उपविभागाने ग्रामपंचायत कावाडे जी ग्रामपंचायत अस्तित्वातच नाही तिच्या नावे प्रभारी उप अभियंता माळी यांनी पत्र दिले.