लातूर जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचे टँकर बंद
By admin | Published: August 2, 2016 11:07 PM2016-08-02T23:07:51+5:302016-08-02T23:07:51+5:30
गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान होत नसल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी २६० गावांत ४६० अधिग्रहणांद्वारे तर ७६ गावांत ७९ टँकरद्वारे
पत्रपरिषद : जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांची माहिती
लातूर : गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान होत नसल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी २६० गावांत ४६० अधिग्रहणांद्वारे तर ७६ गावांत ७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. तर मनपाद्वारे ७० टँकर बाहेरून पाणी आणण्यासाठी सुरू होते. परंतु, दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे जिल्हा परिषद व मनपाचे बाहेरील सर्व टँकर बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी पत्रपरिषदेत दिली.
गेल्या तीन वर्षांपासून लातूर शहरासह जिल्ह्याला अवर्षणग्रस्त परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, अहमदपूर, शिरूर अनंतपाळ, उदगीर, देवणी, जळकोट या दहा तालुक्यांतील ७६ गावांत ७९ टँकरद्वारे तर २६० गावांत ४६० अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला होता. परंतु, गेल्या दोन दिवसांमध्ये ४६७.७७ मि.मी. पाऊस झाल्याने पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ऐतिहासिक विहिरी व इतर स्थानिक जलस्त्रोतांमध्ये पाणी वाढल्याने जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू असलेले सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिकेअंतर्गत लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेले ७० टँकरही बंद करून लातूर शहराला स्थानिक जलस्त्रोतांतून पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे लातूर शहरातील नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. पर्यायी पाण्याची सोय व्हावी म्हणून साई, नागझरी व भंडारवाडी येथून होणारा पाणीपुरवठा रोटेशन पद्धतीने शहराला कायम सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रेल्वेबाबतही लवकरच निर्णय...
लातूर शहराला मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा सुरू आहे. हा पाणीपुरवठा आॅगस्ट अखेर सुरू राहणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी स्थानिक जलस्त्रोतांतील पाणीसाठा वाढल्यामुळे चालू असलेल्या रेल्वेच्या पाणीपुरवठ्याबाबतही निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले. यावेळी पत्रपरिषदेला जिल्हा कृषी अधीक्षक प्रतापसिंह कदम, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता रुपाली ठोंबरे, अभियंता सु.ब. चव्हाण आदी उपस्थित होते.
शहरातील पाण्याबाबत नियोजन करू...
स्थानिक जलस्त्रोतातील पाणीसाठा वाढला आहे. परंतु, नळाद्वारे पाणी देण्याची रुटिंग लागेपर्यंत काही भागांत रोटेशन पद्धतीने काही टँकर काही दिवसांपुरते सुरू राहणार आहेत. सध्या काही भागांतील पाणी नियोजनाबाबत टँकरवाले गांभीर्याने घेत नसले तरी याबाबत नियोजन करू, असेही ते म्हणाले.
वृक्ष ६ हजार अन् खड्डे १० हजार...
२ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत शासनाने १ जुलै रोजी जिल्हाभरात वृक्ष लागवड सुरू केली. यामध्ये महानगरपालिकेला ६ हजारांचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, जिल्हास्तरावर वाढीव उद्दिष्ट देण्यात आल्याने मनपाने दहा हजार खड्डे घेतले. परंतु, शहरात लावण्यायोग्य झाडे उपलब्ध नसल्याने लागवडीची प्रक्रिया रखडली आहे. परंतु, झाडे उपलब्ध होताच लागवड केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी पत्रपरिषदेत सांगितले.