पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2016 01:07 AM2016-08-04T01:07:18+5:302016-08-04T01:07:18+5:30
पारवडी येथील भिसेशिपकुले वस्ती, गावडेवस्ती, अंबारवस्ती तसेच गावठाणात दररोज टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पारवडी : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले आहेत, तरीदेखील पारवडी येथील भिसेशिपकुले वस्ती, गावडेवस्ती, अंबारवस्ती तसेच गावठाणात दररोज टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पारवडी येथे गेल्या वर्षापासून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेल्या ओढा खोलीकरण नवीन बंधारे बांधणी अशी कामे सुरू आहेत. वेगवेगळ्या सामाजिक संस्था, खासगी कारखाने खडकवासला पाटबंधारे विभाग, तसेच लघुपाटबंधारेविभाग, कृषी विभाग यांच्या वतीने ही कामे सुरू आहेत. त्यामुळे पारवडी परिसरातील केवळ ३० टक्के परिसरातील पाणीटंचाई दूर झालेली आहे. पारवडीच्या भौगोलिक परिस्थितीत प्रत्येक वस्तीतून नैसर्गिक ओढ्याचे प्रवाह आहेत. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान राबविताना केवळ गावातील एकाच ओढ्याचे खोलीकरण करण्यात आले आहे.
इतर परिसरात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे, याबाबत पारवडीचे ग्रामसेवक शहानूर शेख यांना माहिती विचारली असता पारवडीत आतापर्यंत आठ किमी लांबीचे ओढा खोलीकरण करण्यात आले आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून राहिलेली ओढा खोलीकरण कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले.
।पाऊस नाही
पारवडी परिसरात ऐन पावसाळ्यात भयंकर परिस्थिती आहे. जलयुक्त शिवारची कामे होऊूनही या भागात पावसाचा मात्र थेंबही पडलेला नाही. या गावाला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.