४० किलोमीटरवरून टँकरने पाणी
By admin | Published: February 11, 2016 01:43 AM2016-02-11T01:43:41+5:302016-02-11T01:43:41+5:30
मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा वाढत असून १,४०० टँकरद्वारे दीड हजार गावे-वाड्यांना पाणीपुरवठा केला जात असला तरी बीड, लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यातील
औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा वाढत असून १,४०० टँकरद्वारे दीड हजार गावे-वाड्यांना पाणीपुरवठा केला जात असला तरी बीड, लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे ३५० गावांना ४० किलोमीटर अंतरावरून टँकरने पाणी आणावे लागत आहे.
पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणातून ४० कि.मी. अंतरावरील गावांना टँकरने पाणी द्यावे लागत असून गंगापूर, वैजापूर, सोयगाव, औरंगाबाद, कन्नड या तालुक्यांतही २० कि.मी.चा फेरा टँकरला मारावा लागत आहे. जिल्ह्यातील २११ गावांसाठी २७४ टँकर लावण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यासह शहरासाठी पर्यायी उपाययोजना करण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. लातूरमध्ये महिन्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे.
शहरासाठी ५ पर्याय निवडण्यात आले असून, त्यातून टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे.
पुढील ३ ते ४ महिन्यांत लातूरमध्ये जागोजागी टँकर उभे
करावे लागणार असल्याचा अहवाल जिल्हा पोलीस प्रशासनाने दिला
आहे. (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यात सर्वाधिक २३८ गावे आणि १९९ वाड्यांसाठी ३२२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. उस्मानाबादला उजनी धरणातून १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तुळजापूर, भूम, परंडा, उस्मानाबाद यासह इतर तालुक्यांत पाणीटंचाई असून, १५८ गावांत २२१ टँकर सुरू आहेत.