मुंबईत १५ ते २० मिनिटेच पाणी तुंबेल : पालिका

By admin | Published: May 21, 2016 02:18 AM2016-05-21T02:18:06+5:302016-05-21T02:18:06+5:30

पालिका प्रशासनाने मात्र यंदाच्या पावसाळ्यात १५ ते २० मिनिटेच पाणी तुंबेल, असा दावा शुक्रवारी केला़

Water tanker in Mumbai for 15 to 20 minutes | मुंबईत १५ ते २० मिनिटेच पाणी तुंबेल : पालिका

मुंबईत १५ ते २० मिनिटेच पाणी तुंबेल : पालिका

Next


मुंबई : नालेसफाईवरून राजकीय कलगीतुरा रंगला असताना पालिका प्रशासनाने मात्र यंदाच्या पावसाळ्यात १५ ते २० मिनिटेच पाणी तुंबेल, असा दावा शुक्रवारी केला़ तसेच पाणी तुंबण्याची संवेदनशील ठिकाणेही ४० वरून तीनवर आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़
नालेसफाईच्या कामावरून राजकीय चिखलफेक सुरू आहे़ विरोधकांनी पोलखोल करण्याचा इशारा दिल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने पाणी तुंबल्यास पालिका प्रशासनालाच जबाबदार धरून आपला बचाव केला आहे़ नालेसफाईवरून चर्चेचा गाळ उडत असल्याने अखेर पालिका प्रशासनाने आज मौन सोडून आपली बाजू पत्रकार परिषदेतून मांडली़
मुंबईत या वर्षी एक महिन्याआधीच म्हणजे १५ मार्च रोजी नाल्यांमधील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे़ त्यानुसार आतापर्यंत मुख्य नाल्यांमधील ६६ टक्के तर वॉर्डमार्फत सुरू असलेल्या छोट्या नाल्यांची सफाई ३५ टक्के झाल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी केला़
>पाणी तुंबण्याची ठिकाणे अवघी तीन
पावसाळ्यात मुंबईत ४० ठिकाणी हमखास पाणी साचत होते़ या ठिकाणांना संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले होते़ मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे आता केवळ हिंदमाता, सायन रोड क्ऱ २४ आणि नायर रुग्णालयाचे प्रवेशद्वार येथेच पाणी तुंबण्याची शक्यता आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला़
हिंदमाता पूरमुक्त करण्यासाठी बांधलेले ब्रिटानिया पंपिंग स्टेशन ३१ मेपासून कार्यान्वित होणार आहे़
मुंबईत पावसाचे पाणी उपसण्यासाठी २९३ पंप लावण्यात येणार आहेत़
>पाणी तुंबणार, मात्र १५ मिनिटेच
ताशी २५ मि़मी़ पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ताशी ५० मि़मी़पर्यंत वाढविण्यात आली आहे़ त्यापुढे पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढू शकत नाही़ मात्र मोठ्या लाटा आणि मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी तुंबले तरी ते १५ ते २० मिनिटेच तुंबेल, असा दावा देशमुख यांनी केला आहे़
>छोट्या नाल्यांच्या सफाईत अडथळा
छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी मागविलेली निविदा ३०० टक्के जादा दराने आल्या होत्या़ दुसऱ्या वेळीच दोनशे आणि त्यानंतर ८० टक्के जादा दराच्या निविदा आल्यामुळे अखेर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी विभागस्तरावरच कामगारांमार्फत छोट्या नाल्यांची सफाई सुरू केली़ यामुळेच आतापर्यंत ३५ टक्केच नाले साफ झाले आहेत़
गाळ टाकण्यासाठी पालिकेची जागा
नाल्यांमधील गाळ टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंड उपलब्ध नसल्याने गेली तीन ते चार वर्षे पालिकेची मोठी अडचण निर्माण झाली होती़ मुंबईशेजारील गावांमध्येही पालिकेने जागा देण्याची विनंती केली़ मात्र अन्य महापालिकांनी नकारघंटाच वाजवली़ त्यामुळे ठेकेदारांनाच गाळ टाकण्याची जागा शोधण्यास बंधनकारक करण्यात आले होते़ यामुळेच घोटाळा करण्याची संधी ठेकेदारांना मिळाली़ बनावट प्रमाणपत्र दाखवून गाळ मुंबईबाहेर नेल्याचे ठेकेदार भासवत होते़ त्यामुळे पालिकेने या वर्षी नाल्यांमधील गाळ टाकण्यासाठी ठाणे जिल्ह्यात नऊ डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था केली आहे़

Web Title: Water tanker in Mumbai for 15 to 20 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.