‘जल है तो कल है’ रांगोळीस ‘लिम्का बुक’चे प्रमाणपत्र
By Admin | Published: May 23, 2017 03:11 AM2017-05-23T03:11:14+5:302017-05-23T03:11:14+5:30
‘जल है तो कल है’ हा जलबचतीचा संदेश देण्यासाठी जळगावात सात एकर क्षेत्रात साकारलेल्या रांगोळीची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ‘जल है तो कल है’ हा जलबचतीचा संदेश देण्यासाठी जळगावात सात एकर क्षेत्रात साकारलेल्या रांगोळीची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. त्याचे प्रमाणपत्र जैन इरिगेशन व नीर फाउंडेशनला नुकतेच मिळाले आहे.
जैन इरिगेशन सिस्टिम्स, नीर फाउंडेशन व शासनाचा जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १० एप्रिल २०१६ रोजी राष्ट्रीय महामार्गावरील खेडी शिवारातील दूरदर्शन टॉवरजवळ सात एकर क्षेत्रात जल है तो कल है हा जलबचतीचा संदेश देणारी रांगोळी साकारली होती. आठ विविध रंगात ६३ टन पर्यावरण पूरक रांगोळीचा वापर करून रांगोळी साकारली होती.
भविष्यात गिनीज बुकमध्येही नोंद होईल
वैश्विक पातळीवर जलबचतीचा संदेश देण्यासाठी सर्वात मोठी रांगोळी साकारण्यात आली. भविष्यात गिनीज बुक आॅफ द वर्ल्ड रिकॉर्डमध्येही आमच्या उपक्रमाची नोंद होईल.
- सागर महाजन,
अध्यक्ष, नीर फाउंडेशन
राज्याला भेडसावणाऱ्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव करून देत, पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा हा जलबचतीचा मोलाचा संदेश नागरिकांपर्यंत रांगोळीच्या माध्यमातूनच पोहोचला. - अशोक जैन, अध्यक्ष, जैन उद्योग समूह, जळगाव