पालिकांसाठीचे पाणी २० टक्क्यांनी महागणार!
By यदू जोशी | Published: September 15, 2017 05:15 AM2017-09-15T05:15:08+5:302017-09-15T05:15:22+5:30
महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांना जलसंपदा विभागाकडून पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या दरात १६ ते २० टक्के वाढ केली जाणार आहे. या दरवाढीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाला दिला असून येत्या आठ दिवसांत त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या गावांसाठीचे पाणीदर मात्र वाढणार नाहीत.
मुंबई : महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांना जलसंपदा विभागाकडून पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या दरात १६ ते २० टक्के वाढ केली जाणार आहे. या दरवाढीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाला दिला असून येत्या आठ दिवसांत त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या गावांसाठीचे पाणीदर मात्र वाढणार नाहीत.
प्राधिकरणाने वाढविलेल्या दरांचा बोजा स्थानिक स्वराज्य संस्थांवर पडेल आणि पर्यायाने तो ग्राहकांवर पडणार आहे.पाणीदर वाढल्याने लहानमोठ्या शहरांमधील पाणीपट्टीचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत असलेल्या पालिकांना पाणीपट्टी (कर) वाढविण्याशिवाय पर्याय नसेल. त्यामुळे राज्यातील पाणी महागणार आहे.
सध्या विविध प्रकारच्या पाणीपट्टीद्वारे जलसंपदा विभागाला दरवर्षी सुमारे ३०० कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळेल. सध्या विभागाला वार्षिक ६५० कोटी रुपये मिळतात. ते उत्पन्न वाढून ९५० कोटी रुपयांवर जाणार आहे. विभागाला वार्षिक १४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशा पद्धतीने पाणीदर निश्चित करण्याची विनंती विभागाने प्राधिकरणाला केली होती. मात्र प्राधिकरणाने सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले. या आधी २०११ मध्ये जलसंपदा विभागाने पाणीदर वाढविले होते. त्यानंतरच्या सात वर्षांत चलनवाढ ५४ टक्के झाली असली तरी पाणीदरातील वाढ सरासरी २० टक्केच करीत असल्याचे समर्थन प्राधिकरणाने केले आहे.
उद्योगांसाठी सध्या १० हजार लिटरमागे ३० ते ६० रुपये पाणीदर जलसंपदा विभागाकडून आकारला जातो.तो आता ४० ते ८० रुपये करण्यात येणार आहे.
महापालिका व नगरपालिकांच्या शहरांत घरगुती वापराच्या पाण्यावरील आकार हा २० टक्के वाढविला जाईल. सध्या १० हजार लिटरमागे १ ते २ रुपये आकारणी केली जाते.
शेतीसाठीच्या पाण्याचे दर १६ टक्के वाढणार आहेत. ग्राम पंचायतींच्या गावांमध्ये पुरविण्यात येणाºया पिण्याच्या पाण्याचा दर १० हजार लिटरमागे ४० पैसे इतका आहे. तो कायम राहील.
बीअर, मिनरल वॉटर महागणार
औद्योगिक वापराच्या पाण्याचे दर सध्या १० हजार लीटरमागे ३० ते ६० रुपये आहेत. ते ४० ते ८० रुपये केले जाणार आहेत. मात्र हे करताना बीअर आणि मिनरल वॉटर उद्योगांसाठीच्या पाण्याचे दर त्यापेक्षा पाच ते सहापट आकारण्यात येणार आहेत. याचा अर्थ या दोन्ही उद्योगांकडून २०० ते ४०० रुपये आकारणी केली जाईल.