तब्बल ६८ वर्षांनी वापरले विहिरीचे पाणी!
By admin | Published: May 23, 2016 04:48 AM2016-05-23T04:48:11+5:302016-05-23T04:48:11+5:30
निजाम राजवटीतील रझाकाराच्या क्रौर्यकथेतील देवणीच्या ऐतिहासिक गढीतील विहिरीच्या नशिबी गेली ६८ वर्षे असलेला कलंक यंदा पुसला गेला. ‘रक्ताची विहीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
चेतन धनुरे, उदगीर
निजाम राजवटीतील रझाकाराच्या क्रौर्यकथेतील देवणीच्या ऐतिहासिक गढीतील विहिरीच्या नशिबी गेली ६८ वर्षे असलेला कलंक यंदा पुसला गेला. ‘रक्ताची विहीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विहिरीचे मोल या भीषण दुष्काळात लोकांना कळाले़ देवणीकर आता याच विहिरीतील पाणी पीत आहेत.
देवणी शहराच्या जुन्या गावभागात निजाम राजवटीत एक जुनी गढी होती़ या गढीतून काही वर्षे निजामाचा महसुली कारभार हाकला गेला़ परंतु रझाकारांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी गढी ताब्यात घेऊन निजामाविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध चेतविले. ही गढी रझाकारांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या देवणीतील स्वातंत्र्यसैनिकांचे जणू ठाणे बनली.
तब्बल २ हजार स्वातंत्र्यसैनिक या गढीत राहायचे. १७ सप्टेंबर १९४८ रोजी या राजवटीतून मुक्ती मिळाली़ परंतु तोपर्यंत रझाकारांनी हे आंदोलन मोडून काढण्यासाठी या गढीतील अनेकांचे जीव घेतले. नाकाबंदी झाल्यावर भुकेने व्याकुळ झालेल्या अनेकांनी या विहिरीत उड्या मारुन जीव दिल्याच्या आख्यायिका आहेत. आत घुसलेल्या रझाकारांनीही गढीतील माणसांना मारून मृतदेह गढीतील विहिरीत टाकल्याचे सांगितले जाते.
स्वातंत्र्यानंतर काही वर्षे ही गढी पोलीस विभागाच्या वापरात होती.जुने पोलीस ठाणे असेही याला संबोधण्यात यायचे़ विशेष म्हणजे, या जागेचा वापर झाला तरी मात्र येथील विहिरीचा मात्र कधीच वापर झाला नाही.
या आठवणी पुसताना ग्रामपंचायतीने बुलडोझर फिरवून गढी भुईसपाट केली. गढी कोसळली, मात्र गढीचा कलंकित इतिहास घेऊन आतील ती पुरातन विहीर मात्र तशीच होती. गेल्या ६८ वर्षांत तिचे पाणी कधीच आटले नाही. परंतु लोकांनी तिचे पाणी साधे ओंजळीतही घेतले नाही. लोक या ‘रक्ताच्या विहिरी’कडे कधी फिरकायचेही नाहीत अन् लेकराबाळांनाही तिकडे जाऊ देत नसत.
मात्र, यंदाच्या दुष्काळाने या विहिरीचा कलंक पुसला. देवणीकरांनी या विहिरीचे पाणी उपसायला सुरू केले आहे. या विहिरीवर कधीही गेले तरी पाच पन्नास माणसे पाणी भरतायत. हीच विहीर जलसंजीवनी बनून ३० हजार लोकसंख्येचे शहर असलेल्या अर्ध्या देवणीची तृष्णा भागवत आहे.
देवणीतील ज्येष्ठ नागरिक बसवणप्पा लांडगे हे इतिहास चाळताना म्हणाले, ही चांगली गोष्ट झाली. त्यावेळी क्रूरपणे हत्या केल्या जात असल्याने जवळपास २ हजार नागरिकांनी या गढीत आसरा घेतला होता़ मधे गोदाम असल्याने तेथील धान्यावर त्यांची काही काळ गुजराण झाली़ परंतु, धान्य संपले. आत धान्य नाही; बाहेर रझाकार. रोज संघर्ष पाचवीला पुजलेला. काही लोकांनी विहिरीत उड्या टाकून जीवन संपविले़ त्यामुळे अख्खा गाव ‘रक्ताची विहीर’ असेच त्या विहिरीला म्हणायचा. मात्र, त्यास बरीच वर्षे होऊन गेली़ आता हे पाणी स्वच्छ आहे़ त्यामुळे लोक इतिहास विसरून आपली गरज भागवीत आहेत़