जलवाहिनीवरील झोपड्या हटविल्या
By admin | Published: June 9, 2016 02:33 AM2016-06-09T02:33:27+5:302016-06-09T02:33:27+5:30
तानसा जलवाहिनीच्या १० मीटर परिसरात उभ्या राहिलेल्या झोपड्या पालिकेने बुधवारी हटविल्या़
मुंबई : तानसा जलवाहिनीच्या १० मीटर परिसरात उभ्या राहिलेल्या झोपड्या पालिकेने बुधवारी हटविल्या़ कुर्ला पूर्व येथे ही कारवाई करण्यात आली़ यामध्ये २२५ हून अधिक बेकायदा बांधकामांचा समावेश आहे़ या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता़
जलवाहिनीच्या दहा मीटर परिसरात बांधकामांना मनाई आहे़ मात्र अनेक ठिकाणी जलवाहिनीच्या परिसरातच अतिक्रमणे उभी राहिली आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जलवाहिन्या अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहेत़ त्यानुसार कुर्ला पूर्व येथील वत्सलाबाई नगरच्या मागे असणाऱ्या तानसा जलवाहिनीलगतच्या दोन्ही बाजूंच्या दहा मीटर परिसरातील अतिक्रमणे पाडण्यात आली़
तानसा मुख्य जलवाहिनीची देखभाल व दुरुस्तीसाठी या झोपड्या हटविणे आवश्यक होते़ या कारवाईत २५ अधिकारी व दीडशे कामारांचा सहभाग होता़
१७४ निवासी बांधकामे, सात व्यावसायिक बांधकामे व इतर प्रकारच्या ४७ बेकायदा बांधकामांवर ही कारवाई झाली़ यामध्ये पात्र झोपड्यांना पर्यायी जागा देण्यात आली आहे, असे एम पश्चिम विभागाचे साहाय्यक आयुक्त हर्षद काळे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)