जळगावातील ‘मारवड विकास मंच’चा जलसंधारणाचा स्तुत्य उपक्रम

By admin | Published: July 4, 2017 08:38 AM2017-07-04T08:38:08+5:302017-07-04T08:38:08+5:30

मारवड विकास मंच : परिसराचा भौगोलिक व शैक्षणिक विकासासाठी तरुणाईची साद

Waterproof project of 'Marwad Vikas Manch' in Jalgaon | जळगावातील ‘मारवड विकास मंच’चा जलसंधारणाचा स्तुत्य उपक्रम

जळगावातील ‘मारवड विकास मंच’चा जलसंधारणाचा स्तुत्य उपक्रम

Next
संजय पाटील/ऑनलाइन लोकमत 
जळगाव(अमळनेर), दि. 4 - ओढ लावती अशी जीवाला गावाकडची माती.... साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती.... या गाण्यातील ओळींप्रमाणेच तरुणांना गावाने ओढ लावली आणि ओढीतून या तरुण रक्ताने युवा पिढी काय करु शकते... हे दाखवून दिले. शिवाय गांधीजींच्या खेड्याकडे चला... या वाक्याप्रमाणे कार्यही केले आणि त्यात त्यांना यशही मिळाले. 
यशाची ही कहाणी आहे मारवड (ता. अमळनेर जि. जळगाव) येथील शिक्षण घेतलेल्या आणि सध्या नोकरीनिमित्त बाहेरगावी अर्थात शहरात असलेल्या तरुणांची. गावासाठी ही तरुण मंडळी एकत्र आली. नंतर मग या ‘मारवड विकास मंच’ असे या गृपचे नामकरण झाले.
 
डिसेंबर २०१४ मध्ये मारवड येथील शिकलेले व बाहेरगावी नोकरीला असलेले १२० तरुण एकत्र आले. ‘गावाकडे चला’ हे ध्येय उराशी बाळगून मूळ म्हणजे ‘रूट (रिटर्न टू ओरिजिन अ‍ॅण्ड ऑर्गनाईज ट्रान्सफॉर्मेशन) या ओबडधोबड संकल्पनेतून प्रत्येकाने १०० रुपये महिना याप्रमाणे १२०० रुपये प्रतिवर्ष जमवण्याचे ठरवले. यातून शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी जलसंधारणाची कामे करण्याचे ठरवण्यात आले. 
 
२ जुलै २०१५ रोजी ‘मारवड विकास मंच’ची स्थापना झाली आणि मंचची सदस्य संख्या १२० वरून थेट २५० वर पोहोचली. आपण वाढलो, शिकलो, त्या गावाच्या आणि परिसराच्या ऋणातून उतराई होण्यासाठी कोणती कामे करू शकतो, याचे सर्वेक्षण या युवकांनीच केले. शिरपूर पॅटर्नचे डॉ. सुरेश खानापूरकर व साताऱ्याचे डॉ.अविनाश पोळ यांचे मार्गदर्शन घेऊन ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
 
नाला खोलीकरणासाठी अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी मशीन, डिझेलची मदत केली. कामांसाठी पैसा अपूर्ण पडू लागल्यानंतर बजाज ऑटो आणि केअरिंग फ्रेण्ड्स मुंबई या संस्थांकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवला. कामांची प्रगती पाहून दोन्ही संस्थांनी अनुक्रमे ३० लाख व १० लाख रुपये निधी दिला. त्यात माळण नदीचे पुनर्जीवन करण्यात आले. दोन कि.मी.लांब, तीन मी.खोल व २४ मी.रुंद असे खोलीकरण करून ३०० ते ४०० मीटर अंतरावर सात टप्पे तयार करण्यात आले. यात सात कोटी लिटर पाणी साठा साचणार आहे. 
 
त्यानंतर गावातीलच काही अधिकाऱ्यांची मदत घेऊन माळण नदीचा २७ कि.मी.चा ‘डांगर ते डांगरी’ असा आराखडा शासनाला सादर करण्यात आला. शासनाने लोकसहभागाची दखल घेत १० कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. यात आठ बंधाऱ्यांचे काम प्रगतीपथावर आहे. डांगरी-कळमसरा रस्ता, वावडे हनुमान मंदिर, मारवड गावठाण, धानोरा, जैतपीर, गलवाडे या ठिकाणी बंधाऱ्यांचे काम सुरू आहे.
 
एका बंधाऱ्यामुळे १० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होणार आहे. तांबोळ्या नाल्याचे साडेसात कि.मी. खोलीकरण करण्यात आले. दोन मीटर खोली, तीन मी. रुंदी अशा परिमाणात लघुजलसंधारण व कृषी विभागातर्फे प्रत्येकी तीन, तीन बंधारे बांधण्यात आले. यातून एकूण २५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 
 
मारवड आरोग्य केंद्रासमोर शेतशिवारातून येणाऱ्या नैसर्गिक प्रवाहाला थांबवून तिथे ९० बाय १०० फूट तलाव खोलीकरण करून १५ फूट उंचीचे बांध बांधण्यात आले. पाणी पाझरू नये, यासाठी पॉलिथिन पेपर, काळीमाती दगड पिचिंग करून पाणी साठवण्यात येणार आहे. या कामासाठी विप्रो कंपनीकडून १२ लाख रुपये मिळाले आहेत.
 
शैक्षणिक विकास
जलसंधारणाच्या माध्यमातून मारवड व परिसरासोबत शैक्षणिक बदलासाठीही विकास मंचच्या तरुणांनी प्रयत्न सुरु केले आहेत. यात शाळेसाठी रंगरंगोटी, सौर पॅनल, शौचालय बांधकाम, संगणक व विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील जि.प.च्या २७ शाळांना ई-लर्निंग कीट, एल.सी.डी. प्रोजेक्टर देण्यात आले. जि.प.शाळेत कुंपण, रंगमंच बांधण्यात आला. यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी (नंदुरबार) , विक्रम टी, बजाज आॅटो यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमांची दखल शासनाने घेतली. या ‘मारवड विकास मंच’ला वसंतराव नाईक राज्यस्तरिय जलसंधारण पुरस्कार जाहीर झाला आहे. 
 
विरोध करण्याचा प्रयत्न 
या कामाच्या वेळी गावातील काही जणांनी विरोधही केला. या विरोधात मागे न हटता या तरुणांनी खोलीकरणातून निघालेला मुरूम शेतशिवार रस्त्यांवर टाकून रस्ते बनवले आणि गाळ शेतीत टाकल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. 
 
वृक्ष लागवड ते स्वच्छता 
एवढ्यावरच न थांबता या युवकांनी एक घराजवळ एक याप्रमाणे ४०० झाडे ट्री-गार्डसह लावली. त्यात २५० झाडे जगली. तसेच परिसरात शेतांमध्येही प्रत्येकी एकप्रमाणे दोन हजार झाडे लावली. गावात स्वच्छतेसाठी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा, लायब्ररीची सुविधा करण्यात आली आहे. 
 

Web Title: Waterproof project of 'Marwad Vikas Manch' in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.