हॉटेल्स, मॉलमध्ये पाण्याचा ठणठणाट
By admin | Published: May 1, 2016 01:33 AM2016-05-01T01:33:50+5:302016-05-01T01:33:50+5:30
गेल्या तीन दिवसांपासून टँकर असोसिएशनने पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका शनिवारी मुंबईतील सर्व हॉटेल्स आणि मॉल्समध्ये जाणवला. पाण्याअभावी अनेक हॉटेल्सनी जेवण बंद करत
- मनोज गडनीस, मुंबई
गेल्या तीन दिवसांपासून टँकर असोसिएशनने पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका शनिवारी मुंबईतील सर्व हॉटेल्स आणि मॉल्समध्ये जाणवला. पाण्याअभावी अनेक हॉटेल्सनी जेवण बंद करत ग्राहकांना केवळ सॅन्डविच अथवा तत्सम खाद्यपदार्थ देण्यास सुरुवात केली होती. केवळ हॉटेलच नव्हे तर शॉपिंग आणि सिनेमासाठी मॉलमध्ये येणाऱ्या हजारो ग्राहकांचेही मोठ्या प्रमाणावर हाल झाले. शनिवारी रात्री उशिरा हा संप मागे घेण्यात आला असून त्यानंतर काही तासांत सर्व पाणी पुरवठा पूर्ववत होईल असा दावा टँकर असोसिएशनने केला आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने या अनुषंगाने पॅलेडियम मॉलला (हायस्ट्रीट फिनिक्स) भेट दिली असता तिथे शनिवारी थेंबभरही पाणी आले नसल्याचे दिसून आले. येथील अनेक हॉटेल्सही तूर्तास ग्राहकांना पूर्ण जेवण देणे बंद केले होते. जेवण बनविण्याकरिता जास्त पाण्याची आवश्यकता भासत असल्यामुळे अनेकांनी जेवणाऐवजी सॅन्डविच अथवा तत्सम खाद्यपदार्थच देण्यास सुरुवात केली होती.
येथील काही हॉटेल मॅनेजरनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मॉलमध्ये पाणी कमी दवाबाने येत होते. परंतु, शनिवारी दिवसभर मॉलमध्ये पाणीच आले नाही. परिणामी, उन्हाळ््याची सुट्टी आणि वीकेन्ड अशा दुहेरी मुहुर्तावर इथे आलेल्या ग्राहकांचे हाल झाले. या संदर्भात फिनिक्समिलच्या प्रतिनिधीला विचारणा केली असता त्याने पाण्याची समस्या असल्याचे मान्य केले. मात्र तांत्रिक काम आणि टँकरची समस्या असल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगितले.
मुंबई शहरातील सर्व हॉटेल्स आणि मॉलमध्ये मिळून दिवसाला २०० पेक्षा जास्त टँकर लागतात. आठवड्याच्या अंती या संख्येत वाढही होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून
या संपामुळे स्थिती भीषण झाली होती. (प्रतिनिधी)
मुंबई महानगरपालिकेने अनेक टँकरवरील पम्प सील केल्याच्या कारवाईच्या विरोधात आम्ही संप पुकारला होता. चर्चेअंती आम्ही आता संप मागे घेतला आहे. शनिवारी रात्रीपासून टँकर पुन्हा रस्त्यावर येतील आणि पुढच्या काही तासांत स्थिती सामान्य होईल.
- जीतू शहा, निमंत्रक,
टँकर असोसिएशन