जलस्रोत शोध, नियोजनासाठी ‘वॉटस्कॅन’
By Admin | Published: May 27, 2016 01:45 AM2016-05-27T01:45:14+5:302016-05-27T01:45:14+5:30
भूगर्भातील पाणीसाठ्याचा शोध आणि त्याच्या नियोजनासाठी भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय)ने विकसित केलेल्या ‘वॉटस्कॅन’ या मशीनचा उपयोग केला जाणार आहे.
मुंबई : भूगर्भातील पाणीसाठ्याचा शोध आणि त्याच्या नियोजनासाठी भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय)ने विकसित केलेल्या ‘वॉटस्कॅन’ या मशीनचा उपयोग केला जाणार आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये या मशीनचा वापर केला जाणार असून टंचाई निवारणासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विधानभवनात विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सीआयआयच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ व मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि लातूर या एकूण दहा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची निवड करुन या भागात जलस्त्रोतांचा शोध, पाण्याची साठवणूक आणि नियोजन करण्यासाठी सीआयआयने विकसित केलेल्या ‘वॉटस्कॅन’ या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त मशिनचा वापर सुरु करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जलसंपदा विभागातील अधिका-यांनी सीआयआयच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या मशीनच्या माध्यमातून जमीनीत कोणत्या ठिकाणी पाणी जमा होतो व कोणत्या ठिकाणी साठवणूक करावयाची आहे याची माहिती मिळते. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय ग्रामविकास संस्था उभारणार - मुख्यमंत्री
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकनेते गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्था स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली असून संस्थेच्या उभारणीबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले.
या प्रस्तावास तातडीने मंजुरी देऊन विद्यापीठात ही संस्था स्थापन करण्यात येईल, असे ते म्हणाले. या संस्थेमार्फत ग्रामीण विकासाकरीता संशोधन, विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातील. कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येणार असून तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विविध अभ्यासक्रम चालविले जातील.