पालिका उद्यानांमध्ये पाण्याची उधळपट्टी
By admin | Published: January 7, 2017 02:46 AM2017-01-07T02:46:32+5:302017-01-07T02:46:32+5:30
नागरिकांच्या पाणी वापरावर निर्बंध घालणारे पालिका प्रशासन स्वत: पाण्याची उधळपट्टी करत आहे.
नवी मुंबई : नागरिकांच्या पाणी वापरावर निर्बंध घालणारे पालिका प्रशासन स्वत: पाण्याची उधळपट्टी करत आहे. शहरातील उद्यानांमध्ये रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ठेकेदारांच्या या निष्काळजीपणाकडे पालिका प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तुर्भे इंदिरानगरमध्ये महापालिकेने २००९मध्ये शांताबाई सुतार उद्यान उभारले आहे. झोपडपट्टीमधील नागरिकांसाठी हे एकमेव उद्यान आहे; पण त्याची देखभाल करण्याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. उद्यानामधील वृक्ष व हिरवळ जगविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. ठेकेदार पाइप लावून उद्यानामध्ये सोडून देत आहे. यामुळे हजारो लिटर पाणी उतारावरून खाली ओढ्यात जात आहे. सारसोळे सेक्टर ६मधील उद्यानामध्येही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असून, येथेही हजारो लिटर पाणी वाया जात आहे. शहरामध्ये दुभाजक वगळून इतर बहुतांश उद्यानांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे.
पालिकाआयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईमधील नागरिकांना प्रतिव्यक्ती १३० लिटर पाणी याप्रमाणे वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. एखाद्या सोसायटीमध्ये अतिरिक्त पाण्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे; पण उद्यानांमध्ये पाण्याचा अपव्यय होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेने स्वयंशिस्तीचे पालन करावे. जे ठेकेदार पाण्याची उधळपट्टी करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)
उद्यानामध्ये वृक्ष व हिरवळीसाठी ठिबक सिंचनाचा उपयोग करणे आवश्यक आहे. पाइपचा वापर केल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना दिल्या जात असून, प्रशासन स्वत: मात्र ठेकेदारांच्या उधळपट्टीकडे दुर्लक्ष करत आहे.
- महेश कोठीवाले,
शाखाप्रमुख, शिवसेना