‘वाट चालावी... दुर्ग-गडकोट किल्ल्यांची!
By admin | Published: February 19, 2016 01:26 AM2016-02-19T01:26:19+5:302016-02-19T01:26:19+5:30
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या स्फूर्तिगीतामधील ओळींमधून आपल्याला सह्याद्रीच्या भव्यतेची जाणीव होऊन डोळ्यांसमोर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील गडकोट किल्ले येतात.
खोडद : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या स्फूर्तिगीतामधील ओळींमधून आपल्याला सह्याद्रीच्या भव्यतेची जाणीव होऊन डोळ्यांसमोर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील गडकोट किल्ले येतात. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत महत्त्वाची बाब म्हणजे, शिवरायांचा जन्म किल्ल्यावरच झाला, अवघ्या स्वराज्याची संपूर्ण बांधणी किल्ल्यांच्या माध्यमातूनच त्यांनी केली, राज्याभिषेक सोहळा किल्ल्यावरच झाला तर महाराजांनी अखेरचा श्वासदेखील किल्ल्यावरच घेतला. यातून शिवरायांचा किल्ल्यांशी असलेला ऋणानुबंध पाहावयास मिळतो. स्वराज्याच्या स्थापनेत शिवरायांनी गडकोट किल्ल्यांचा अगदी पुरेपूर उपयोग करून आपल्यासमोर निसर्ग, पर्यावरण व गडकोट किल्ल्यांविषयी एक सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे. स्वराज्यासोबतच महाराजांचा पर्यावरणाविषयी व निसर्गाविषयी असणारा सकारात्मक दूरदृष्टिकोन आपल्याला पाहावयास मिळतो. केवळ महाराजांच्या प्रतिमेला हार घालून आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा देऊन चालणार नाही, तर महाराजांची विचारसरणी अंगीकारण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.
राकट, कणखर आणि निसर्गरम्य म्हणून ओळख असलेली जुन्नरची भूमी ज्याप्रमाणे संत महात्म्यांची, साधूसंतांची, शिवरायांची म्हणून ओळखली जाते त्यापेक्षाही, गडकोट किल्ल्यांची, लेण्यांची भूमी म्हणूनही पर्यटकांना, गिर्यारोहकांना आकर्षित करणारी आहे. जुन्नरचं नाव घेतलं, की एकच गोष्ट डोळ्यांसमोर येते, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. इतकी महत्त्वाची ऐतिहासिक गोष्ट येथे घडलीय, की त्यापुढे जुन्नरचा शिवजन्माआधीचा आणि नंतरचा इतिहास अगदी झाकोळून जातो. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर, कड्या-कपारीत, स्वराज्याचे पाय घट्ट रोवून पारतंत्र्याच्या ग्लानीतून महाराष्ट्र भूमी जागी होऊ पाहात होती, कोणाच्या भरवशावर? शिवबाच्या! व शिवबाची भिस्त कोणावर? रांगडे गडकोट व राकट मावळे! पण गडकोट शिवाजी महाराजांनीच बांधायला सुरुवात केली का? तर नाही, शिवाजी महाराजांच्या फार आधीपासून किल्लेबांधणी हे शास्त्र वापरात होते. मग जुन्नरमधील गडकोटांचा जर अभ्यास करायचा झाला तर शिवनेरीसोबत एकूण ७ गिरीदुर्ग आहेत. नाणेघाटाचा राखणदार जीवधन, जुन्नर मावळ प्रांताचा पहारेकरी, कुकडेश्वराजवळचा चावंड, माणिकडोहजवळचा निमगिरी व हडसर किल्ला, माळशेज घाटाच्या डोक्यावरचा शिंदोळा किल्ला, जुन्नर शहराचा मानकरी शिवनेरी किल्ला व नारायणगावाचा शिलेदार नारायणगड.
शिवजन्मस्थळाला मिळाली झळाळी
लेण्याद्री : शिवनेरीवरील घडीव दगडी बांधणीतील जुन्या वास्तुशैलीचा उत्तम नमुना असलेली इमारत म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराजांचे जन्मस्थान होय. सरकारवाडा इमारतीच्या अवशेषात केवळ तळमजला शाबूत असलेली ही इमारत लोकपरंपरेने शिवरायांचे जन्मस्थान म्हणून मान्यता पावली. सन १९२४ पर्यंत या इमारतीचा केवळ तळमजलाच अस्तित्वात होता. या भग्न वास्तूची उभारणी करून नवीन आकर्षक स्वरूपात पुनर्उभारणी १९२५ मध्ये करण्यात आली. कोल्हापूरच्या शाहूमहाराजांचे ज्येष्ठ पुत्र राजाराममहाराज, तत्कालीन मुंबई इलाक्याचे शिक्षणमंत्री भास्करराव जाधव यांच्या पुढाकारातून शिवजन्मस्थळाची पुनर्उभारणी करण्यात आली.
किल्लेसंवर्धन समिती नावालाच
लेण्याद्री : गेल्या पाच वर्षांपासून किल्लेसंवर्धन विकास महामंडळाची स्थापना करण्याच्या मागणीचा पाठपुरावा संस्थेकडून सुरू आहे. याबाबत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राज्यात शिवछत्रपतींच्या इतिहासाचा वारसा गडकिल्ल्यांच्या रूपात लाभला आहे. मात्र वर्षानुवर्षे किल्ले संवर्धनाकडे दुर्लक्ष झाले आहे. गडकिल्ल्यांचा विकास व्हावा व त्यातून पर्यटन व्यवसाय, रोजगार निर्मिती आणि महसूलवृद्धी व्हावी यासाठी या मागणीचा पाठपुरावा सुरू आहे. शिवकालीन दुर्गबांधणीचा ‘मॉडेल फोर्ट’ ठरलेल्या किल्ले शिवनेरी विकास प्रकल्पात अनेक शासकीय खात्यांतील अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांना या विकासासाठी प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार होते. मात्र राज्यातील किल्लेसंवर्धन समितीला कोणतेही अधिकार नसल्याने ही समिती नावापुरतीच असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. मागील वर्षी शिवजयंतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवनेरीवर किल्लेसंवर्धन समितीची घोषणा केली; मात्र या समितीवर केवळ सल्लागार मंडळी नेमण्यात आली. या समितीने २० किल्ल्यांचा विकास करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला; परंतु तो विकास कोणी करायचा, कसा करायचा, याची कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे त्यामध्ये नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने किल्लेसंवर्धनाच्या कार्यात सहभाग घेतलेल्या अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश करून पथदर्शी प्रकल्प अमलात आणावेत, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष राहुल गाजरे यांनी केली आहे.
२००० वर्षांपूर्वी जुन्नर प्रांती सातवाहन राजे राज्य करत होते. तत्कालीन जुन्नरला प्रमुख व्यापारी मार्ग नाणेघाटामुळे कमालीचे महत्त्व होते. घाटाखाली कल्याण, नालासोपाऱ्यापासून सुरू होणारी ही व्यापारवाट नाणेघाटमार्गे घाटमाथ्यावर येत होती आणि जुन्नरच्या घनदाट निबिड जंगलातून वाट काढत जीर्णनगरीत (जुन्नर) प्रवेश करत होती व पुढे नारायणगाव मार्गे अंबिकानगर (अहमदनगर)पासून पुढे प्रतिष्ठानला (पैठण) जात असे. जुन्नर प्रांताचे अर्थकारण नाणेघाटाच्या अवतीभवती होते म्हणून या परिसराला, इथल्या व्यापार उदीमला आणि पर्यायाने व्यापाऱ्यांना संरक्षण देणे ही प्रत्येक राजवटीची गरज होती. जुन्नरच्या हद्दीत नाणेघाटापासून तर जुन्नर शहरापर्यंतच्या प्रवासात आजूबाजूच्या डोंगररांगांमधील टेहळणीसाठी योग्य अशा जागांचा सैनिकीनाके म्हणून उपयोग सुरूझाला. मग गरजेनुसार त्या सैनिकीनाक्यांवर बांधकामे सुरूझाली आणि हळूहळू त्यांचे रूपांतर किल्ल्यांमध्ये झाले. साधारण तिसऱ्या शतकापर्यंत नाणेघाट मार्गे चालणारा व्यापार मंदावला. पण तोपर्यंत हे गडकोट आपले काम चोख बजावत होते आणि आता ते स्वयंभू गिरीदुर्ग म्हणून उदयास आले होते. याच किल्ल्यांचा उपयोग मग लष्करी कामासाठी सुरू झाला. जुन्नरमधील हे सर्व किल्ले तितकेच जुने आहेत, काळासोबत बदलत गेलेल्या राजवटींनी वेळोवेळी किल्ल्यांची डागडुजी आपापल्या बांधकाम शैलीनुसार केली. त्यामुळे आज आपल्याला त्यांचा इतिहास कळण्यास मदत झाली. प्रत्येक किल्ला आपला इतिहास जपून आहे, काही कळतो तर काही अजूनही अबोल आहे.