वावेस होम्सला दोन भागीदारांसह २ लाखांचा दंड
By admin | Published: January 20, 2017 04:10 AM2017-01-20T04:10:38+5:302017-01-20T04:10:38+5:30
अरविंदरसिंग आणि हरी गुप्ता यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २ लाख २० हजारांचा दंड सुनावला आहे.
ठाणे : ग्राहकाकडून सदनिकेकरिता स्वीकारलेली रक्कम २ वर्षांनंतर कोणत्याही सूचनेशिवाय परत करून आणि करार रद्द करून सदोष सेवा देणाऱ्या वावेस होम्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे भागीदार अरविंदरसिंग आणि हरी गुप्ता यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २ लाख २० हजारांचा दंड सुनावला आहे.
के. महाबला आलवा यांनी मेसर्स वावेस होम्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कर्जत येथील प्रकल्पात सदनिका घेण्यासाठी मे २०११ रोजी डेव्हलपर्सच्या ठाणे येथील कार्यालयात १० हजार जमा केले. जुलै २०११ मध्ये त्यांना अलॉटमेंट लेटर दिले. त्यानंतर, त्यांनी १८१८७५ रुपये चेकद्वारे दिले. तर, उर्वरित १०२०६२५ रुपयांची जमवाजमव केली. मात्र, जून २०१३ रोजी वावेस होम्स प्रायव्हेट लिमिटेडने सदनिका खरेदीचा करार रद्द करून १,९१,८७५ रुपये चेकद्वारे आलवा यांना परत दिले. दोन वर्षांनंतर पैसे परत दिल्याने नवीन सदनिका घेताना अधिक किंमत द्यावी लागेल. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे, असे सांगून आलवा यांनी वावेस होम्स आणि भागीदारांविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता आलवा यांच्याकडे सर्व कागदपत्रे चोख असल्याचे मंचाने सांगितले.
>दोन वर्षे आलवा यांचे पैसे वापरून डेव्हलपर्सने कोणतीही सूचना न देता करार रद्द करून सदोष सेवा दिली आहे. तसेच सदनिकेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले का? प्रोजेक्ट पूर्ण का होत नाही? पूर्वसूचना न देता करार रद्द का केला? याचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे आलवा यांचे नुकसान झाल्याचे मंचाने स्पष्ट केले. परिणामी, वावेस होम्स प्रायव्हेट लिमिटेडसह त्यांचे भागीदार अरविंदरसिंग आणि हरी गुप्ता यांनी आलवा यांना नुकसानभरपाई म्हणून २ लाख व तक्रार खर्च म्हणून २० हजार द्यावे, असे आदेश मंचाने दिले आहे.