लाटेत ओंडकेसुद्धा तरंगतात!

By admin | Published: June 20, 2016 05:29 AM2016-06-20T05:29:04+5:302016-06-20T05:29:04+5:30

लाटा येतात आणि जातात. लाटेत ओंडकेसुद्धा तरंगतात, पण लाट ओसरल्यानंतर गोटेही उघडे पडतात, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मोदीलाटेचा समाचार घेतला.

The waves roll in the otkyke! | लाटेत ओंडकेसुद्धा तरंगतात!

लाटेत ओंडकेसुद्धा तरंगतात!

Next

‘सिंह’ म्हणवून घेणारे तेव्हा बिळात लपले
मुंबई : लाटा येतात आणि जातात. लाटेत ओंडकेसुद्धा तरंगतात, पण लाट ओसरल्यानंतर गोटेही उघडे पडतात, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मोदीलाटेचा समाचार घेतला. सत्तेसाठी आम्ही कधी लाचार झालो नाही की कधी वेडीवाकडी तडजोड केली नाही. स्वाभिमानाने युती करू, पण त्यासाठी लाचार होऊन तुमच्या मागे धावणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजपाला दिला.
शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्र (एनएसई) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा ओघवता आढावा घेत उद्धव यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, आपलेच विरोधक आपल्या अंगावर आले, पण शिवसेना मागे हटली नाही. शिवसेनेवर बंदी आणण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले. गुंडांची टोळी, प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेला हिणवले गेले; पण हेच गुंड प्रसंगी धाऊन आले. बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर आज स्वत:ला ‘सिंह’ म्हणवून घेणारे तेव्हा बिळात लपून बसले होते. पण बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांच्या पाठीशी शिवसेनाप्रमुख खंबीरपणे उभे राहिले. मुंबईतील दंगलीच्या काळातही शिवसेनेचे वाघच हिंदंूच्या रक्षणासाठी धावून आले, याची आठवणही त्यांनी करून दिली.
सध्या भाजपा-शिवसेनेत सुरू असलेली ‘तू तू मैं मैं’ आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. एनएसईच्या प्रांगणात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी
झाले होते. शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)

जमिनीवर रहा; गडकरींचा मंत्र्यांना सल्ला
पुणे : मंत्रिपदात काही अर्थ नाही. पद गेले की सगळे संपते; कार्यकर्ता कधी संपत नाही. त्यामुळे पाय जमिनीवर ठेवा, असा वडीलकीचा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यासपीठावरील मंत्र्यांकडे बघत दिल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये गडकरींच्या या ‘लेकी बोले सुने लागे’ उक्तीची जोरदार चर्चा रंगली.
भाजपाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीचा समारोप रविवारी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बालगंधर्वमध्ये झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, हंसराज अहीर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ मंत्री, व वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. खुमासदार शैलीत गडकरी म्हणाले, सत्ता नसली की व्यवस्थित असते. सत्ता आली की कलह सुरू होतात. तसे करू नका, ध्येय लक्षात ठेवा. आपला पक्ष वेगळा आहे. यात कधीही कोणाच्या मनासारखे होत नाही; माझ्याही झाले नाही, असे म्हणताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकल्यामुळे हशा पिकला. (प्रतिनिधी)

खसखस
मंत्री आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांना कसे सांभाळावे, याचा किस्सा सांगत असताना गडकरी यांनी ‘काय, बरोबर आहे ना,’ असे थेट दानवे यांना विचारले, तेव्हाही सभागृहात खसखस पिकली.

अच्छे दिन आले की येणार?
केंद्रातील मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘देश बदल रहा हैं’ अशी जाहिरातबाजी केली जात आहे. त्याचा उल्लेख करीत उद्धव म्हणाले, की देश बदल रहा है म्हणता, पण परिस्थिती कुठे बदली? अच्छे दिन आले की येणार आहेत, हे माहीत नाही. महागाईत सर्वसामान्य जनता पिचून निघाली आहे. तेव्हा आधी महागाई नियंत्रणात आणा, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले.

एकहाती सत्ता आणण्याची धमक : मुंबईसह नऊ महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांत स्वाभिमानाने युती होणार असेल तरच करू अन्यथा एकहाती सत्ता आणण्याची धमक आमच्यात आहे. तेव्हा स्वबळावर लढण्यासाठी शिवसैनिकांनी तयार राहावे, असे आवाहन करीत उद्धव यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.

Web Title: The waves roll in the otkyke!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.