वॅक्स म्युझियममध्ये 'सैराट'चा फिव्हर, आर्ची-परशाचाही समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2016 10:54 AM2016-08-12T10:54:03+5:302016-08-12T12:35:44+5:30
सैराट सिनेमातील आर्ची, परश्याची क्रेज अद्यापही कायम असून भारतातील पहिले मेणाचे संग्रहालय असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियममध्ये त्यांच्या मेणाच्या पुतळ्याचा समावेश होणार आहे.
>विशाल विकारी
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १२ - सैराट सिनेमातील आर्ची, परश्याची क्रेज अद्यापही कायम असून भारतातील पहिले मेणाचे संग्रहालय असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियम मध्ये आर्ची, परश्या व नागराज मंजुळे यांचे मेणाचे पुतळे तयार करण्यात येणार आहे. या संग्रहालयातील वँक्स कलावंत सुनिल कंडलूर यांनी या कलाकारांचे मोजमाप घेतले असून येत्या दोन महिन्यात हे मेणाचे पुतळे तयार होतील अशी माहिती कलावंत सुनिल कंडलूर व संचालक सुभाष कंडलूर यांनी दिली.
सैराट सिनेमाच्या यशानंतर सध्या आर्ची, परश्यांची क्रेज सर्वत्र वाढली आहे. त्यांना पाहण्यासाठी महाराष्ट्रातील जनता सैराट झाली आहे, अशा कलावंताचे पुतळे संग्रहालयात उभारण्याचा चंग सुनिल कंडलूर यांनी बांधला व कमीत कमी कालावधीत या कलावंतानी देखिल याकरिता सहमती दर्शविल्याने पुतळे बनविण्याचे काम हाती घेण्यात आले असुन यातील पहिली पायरी असलेले कलावंताचे मोजमाप घेण्याचे काम पुर्ण झाले आहे. आर्ची (रिंकू राजगुरु), परश्या (आकाश ठोसर) व नागराज मंजुळे यांच्या हस्तेच या पुतळ्यांचे अनावरण करण्यात येणार असल्याचे सुभाष कंडलूर यांनी सांगितले. सध्या सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियममध्ये अनेक क्रांतीकारक, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, अभिनेते, अभिनेत्री यांचे जवळपास शंभर मेणाचे पुतळे असून रविना टंडन, सोनू सुत, जँकलिन, प्रकाशराज, श्रेया शरण, मि. वर्ल्ड अनुप सिंग ठाकूर, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, थोर समाजसुधारण ज्योतिबा फुले यांचे मेणाचे पुतळे बनविण्याचे काम सुरु आहे.