मार्ग वेगळा, ध्येय एकच!

By Admin | Published: February 15, 2015 01:45 AM2015-02-15T01:45:44+5:302015-02-15T01:45:44+5:30

भाषणाची सुरुवातच मोदी यांनी ‘शेतकऱ्यांसाठी विविध प्रयोग करणारे शरद पवार’ अशी करीत पवार कुुटुंबीयांवर स्तुतिसुमने उधळली.

Way aside, the goal is the same! | मार्ग वेगळा, ध्येय एकच!

मार्ग वेगळा, ध्येय एकच!

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी : बारामतीत पवारांवर स्तुतिसुमने
मोदी म्हणतात,शरद पवारांकडून धडे घेत आलोय
बारामती : आम्ही वेगवेगळ्या पक्षांत असलो, तरी राजकारणापेक्षा राष्ट्रकारण महत्त्वाचे मानतो. मार्ग वेगवेगळे असले तरी विकास हेच आमचे लक्ष्य आहे, असे सांगत सरकार कसं चालवायचं, राज्य आणि केंद्रामध्ये समन्वय कसा ठेवायचा, या बाबतीत मी शरद पवारांकडून धडे घेत आलोय. यापुढेही त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घ्यायचा आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये शनिवारी खास शैलीत साखरपेरणी केली!
मोदी यांच्या बारामती दौऱ्यानिमित्त माळेगाव येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भाषणाची सुरुवातच मोदी यांनी ‘शेतकऱ्यांसाठी विविध प्रयोग करणारे शरद पवार’ अशी करीत पवार कुुटुंबीयांवर स्तुतिसुमने उधळली. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना केंद्रात पवार हे आपला एकमेव दुवा होते. महिन्यातून दोन-तीन वेळा तरी आमचे बोलणे व्हायचे. केंद्राकडील गुजरातच्या अनेक प्रश्नांची त्यांनी सोडवणूक केली, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. केंद्र व राज्यातील शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी पवार ‘मध्यस्थ’ म्हणून उत्तम भूमिका पार पाडतात, असे गोड कौतुक केले. पण त्याचबरोबर मागील १० वर्षांत जे झाले नाही, ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली आहे, असा मिश्कील टोमणाही पवारांना मारला.
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान बारामतीमध्ये सभा घेऊन पवार काका- पुतण्याचे साम्राज्य खालसा करा; गुलामीतून मुक्ती मिळवा, अशा शब्दांत मोदींनी पवारांवर शरसंधान केले होते. शरद पवार यांनीही मोदींवर पलटवार केले होते. याचा संदर्भ देत मोदी हसत हसत म्हणाले, की मी तेव्हा काय म्हणालो होतो, शरद पवार यांनी काय उत्तर दिले होते, याचा शोध मीडिया घेईल; परंतु वाद आणि संवाद हे लोकशाहीचे सौंदर्य आहे. मी आणि शरद पवार दोघेही राजकारणात आहोत आणि वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहोत. दोघांसाठीही राजकारणापेक्षा राष्ट्रकारण महत्त्वाचे आहे. पक्षापेक्षा देश मोठा आहे; पण हे लक्षात घेतले जात नाही. त्यामुळेच आपल्या देशात दोन भिन्न पक्षांतील नेत्यांची भेटही मोठी बातमी होते. (प्रतिनिधी)

जिथे गती तिथे प्रगती ! बारामतीत ४० वर्षांपासून पवारांचे राज्य आहे. मात्र येथील प्रश्न सुटू शकले नाहीत, अशी टीका मोदींनी लोकसभा निवडणुकीत केली होती. आज मात्र पूर्णपणे ‘यू टर्न’ घेत बारामतीच्या शेतकऱ्यांमध्ये मती आहे आणि गती आहे. जिथे मती आणि गती असते, तिथे प्रगती असते, असे मराठीमध्ये सांगून बारामतीच्या प्रगतीची स्तुती केली.

धनगर आरक्षणाला बगल
शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात साखर कारखान्यांना मदत आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. मात्र पंतप्रधान मोदींनी या दोन्ही मुद्द्यांना सोयीस्करपणे बगल देत राजकीय मुत्सद्देगिरीची चमक दाखवली.

उद्धव ठाकरेच बोलतील..!
पंतप्रधानांनी अशा एखाद्या शैक्षणिक कार्यक्रमाला उपस्थिती लावणे, हा राजशिष्टाचाराचा एक भाग असतो. बारामतीत पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांनी केलेली वक्तव्ये पाहता त्यातून लगेच काही राजकीय निष्कर्ष काढणे योग्य नाही. परंतु यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच योग्य वेळी बोलतील.
-नीलम गोऱ्हे, प्रवक्त्या, शिवसेना

पुणे हे भारताचे डेट्रॉइट
च्अभियांत्रिकीच्या संधी तसेच औद्योगिकीकरणामुळे पुणे शहर हे भारताचे ‘डेट्रॉइट’ (अमेरिकेतील औद्योगिक शहर) म्हणून उदयास येत आहे, असे गौरवोद्गार मोदी यांनी काढले. चाकण एमआयडीसी फेज-२ मधील जनरल इलेक्ट्रॉनिक्सच्या नवीन ब्रिलियंट फॅक्टरीचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. - सविस्तर वृत्त/८

संग्रहालयात रमले
पंतप्रधान मोदी
च्बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांना आतापर्यंत मिळालेल्या वस्तू ठेवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रदर्शनात चांगलेच रमले.
च्विद्या प्रतिष्ठानला भेट देऊन त्यांनी अभ्यासक्रमांची माहिती घेतली़ सीबीएसई स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन केले. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
च्कृषी विकास प्रतिष्ठानच्या आवारातील आप्पासाहेब पवार सभागृहाचे उद्घाटन त्यांनी केले. तेथून कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. नेदरलॅँडच्या सहकार्याने विकसित टोमॅटोच्या निर्यातक्षम वाणाची त्यांनी विशेष माहिती घेतली.
च्पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजन घेतले. मोदी यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहनसिंग, राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री गिरीश बापट, नेदरलँडचे राजदूत स्टोइलिंग, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आदी या वेळी उपस्थित होते.

तुमची गळाभेट
आम्ही कशी पचवायची?
निवडणुकीत आम्ही तुम्हाला भाबडेपणानं मतदान केलं. पण तुम्ही जर आता आमच्यात काही वितुष्ट नाही असं सांगत गळ्यात गळे घालून फिरणार असाल, तर हे कसं पचवून घ्यायचं, असा रोखठोक सवाल अभिनेते नाना पाटेकर यांनी उपस्थित केलाय. ‘आयबीएन लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत नानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांच्या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बारामतीला भेट दिली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख ‘नॅशनल करप्ट पार्टी’ असा करीत पवार काका-पुतण्यावर टीकेचे प्रहार करणाऱ्या मोदींनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जाहीर स्तुतिसुमने उधळली. त्यामुळे अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या आहेत. या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात असतानाच प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी या दौऱ्यावर तीव्र प्रतिक्रि या व्यक्त केली.
नाना म्हणाले, की मी एक सर्वसाधारण मतदार म्हणून तुम्हाला मतदान करतो आणि निवडणुकीनंतर जर तुम्ही आमच्यात काही वितुष्ट नाही, असं म्हणत गळ्यात गळे घालणार असाल, तर हे कसं चालणार? आम्हाला नुसती आश्वासनं नको. पुढच्या दिवाळीला नक्की सायकल घेऊ, असं माझा बाप मला आश्वासन द्यायचा. पण मला माहीत होतं, तसं होणार नाही. कारण माझा बाप थकलेला असायचा. मुलाला कुठे वाईट वाटू नये, म्हणून ते बोलायचा. मला ते चालायचं.
पण तुमचं तसं नाहीये. तुम्ही सर्वांनी तुंबड्या भरलेल्या आहेत. मला तुमच्याबद्दल डोळ्यात पाणी यावं, आदर वाटावं असं तुम्ही काही केलंच नाही; तर आमच्याकडून अशी अपेक्षा ठेवताच कशाला, असा सवाल करीत तुमचे हे असेच चालणार असेल तर लोक मनसे, शिवसेना व एमआयएमला मतदान केल्याशिवाय राहणार नाहीत, असेही नानांनी सुनावले आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Way aside, the goal is the same!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.