बीकेपीएस आर्किटेक्चर कॉलेज बंद होण्याच्या मार्गावर
By Admin | Published: July 14, 2017 01:19 AM2017-07-14T01:19:18+5:302017-07-14T01:19:18+5:30
भारतीय कला प्रसारणी सभेच्या (बीकेपीएस) कॉलेज आॅफ आर्किटेक्चरचे प्रथम वर्षाचे प्रवेश कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरने थांबविले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील नावाजलेल्या आर्किटेक्चर महाविद्यालयांपैकी एक असणाऱ्या भारतीय कला प्रसारणी सभेच्या (बीकेपीएस) कॉलेज आॅफ आर्किटेक्चरचे प्रथम वर्षाचे प्रवेश कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरने थांबविले आहेत. त्यामुळे या महाविद्यालयाची बंद होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांना कमी खर्चात शिक्षण उपलब्ध करून देणारे हे महाविद्यालय बंद होऊ नये, अशी भावना महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरची स्थापना होण्यापूर्वी म्हणजेच १९५४ मध्ये महाविद्यालय सुरू झाले. राज्यात केवळ तीन अनुदानित महाविद्यालये आहे. त्यात मुंबईमधील जे. जे. स्कूल आॅफ आर्किटेक्चर, रचना संसद आणि पुण्यातील टिळक रस्त्यावरील बीकेपीएस कॉलेज आॅफ आर्किटेक्चर या महाविद्यालयांचा समावेश आहे. पुरेशा जागा उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. त्यातही गुणवंत व गरीब
विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांचे शुल्क भरणे शक्य नसते. राज्यातील सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांमधून केवळ ४० विद्यार्थ्यांना या महाविद्यालयातील ५ वर्षांच्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळतो; मात्र, आर्किटेक्चर कौन्सिलच्या समितीने केलेल्या पाहणीत त्यांना महाविद्यालयात काही त्रुटी अढळून आल्या. परिणामी, कौन्सिलकडून महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे प्रवेश थांबविण्यात आले.
>अपुरी जागा, प्राध्यापकांची संख्या कमी
महाविद्यालयाकडे उपलब्ध जागा अपुरी असून, प्राध्यापकांची संख्याही कमी आहे, असे कारण सांगून कौन्सिलने महाविद्यालयाचे प्रवेश थांबविले आहेत. मात्र, कौन्सिल स्थापन होण्यापूर्वी महाविद्यालय सुरू झाले आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर कौन्सिलने नियम तयार केले आहेत. परिणामी नंतर तयार केलेल्या नियमानुसार महाविद्यालयाला जागा वाढवता येणे शक्य नाही. तसेच, शासनाकडूनच प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी मान्यता दिली जात नसल्याने प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. जागा कमी असताना व प्राध्यापकांची संख्या कमी असताना महाविद्यालयाचा निकाल चांगला आहे. तसेच, गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठात प्रथम येण्याचा मान याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळत असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. त्यामुळे प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्याचा निर्णय योग्य आहे का, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
>आर्किटेक्चर कौन्सिलने घेतलेल्या निर्णयामुळे पुण्यातील एकमेव अनुदानित आर्किटेक्चर महाविद्यालयामधील प्रवेश थांबविण्यात आले आहेत. तंत्र शिक्षण विभागाने प्रवेश रोखले नाहीत. कौन्सिलने प्रवेशास मान्यता दिली, तर पुढील शैक्षणिक वर्षापासून पुन्हा विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतील.
- डॉ. दिलीप नंदनवार,
सहसंचालक, तंत्र शिक्षण, पुणे विभाग
>महाविद्यालयात प्राध्यापकांची संख्या कमी आहे. तसेच, महाविद्यालयाकडे उपलब्ध असणारी जागा अपुरी आहे. हे कारण सांगून कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरने यंदा प्रथम वर्षात प्रवेश थांबविले आहेत. त्यामुळे अनुदानित महाविद्यालय असूनही विद्यार्थ्यांना प्रवेश देता आले नाही.
- पुष्कर कानविंदे,
प्राचार्य, बीकेपीएस, कॉलेज आॅफ आर्किटेक्चर