वनस्पतींसह प्राण्यांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 06:26 AM2019-02-07T06:26:26+5:302019-02-07T06:26:48+5:30
धिवासावर झालेले आक्रमण, नव्याने प्रचलित झालेल्या प्रजातींचे अतिक्रमण, प्रदूषण, जागतिक स्तरावरील हवामानात होणारे बदल, प्रजातींचे अतिशोषण, वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातील मानवी हस्तक्षेप आदींमुळे जैवविविधतेची हानी होत आहे.
- सचिन लुंगसे
मुंबई : अधिवासावर झालेले आक्रमण, नव्याने प्रचलित झालेल्या प्रजातींचे अतिक्रमण, प्रदूषण, जागतिक स्तरावरील हवामानात होणारे बदल, प्रजातींचे अतिशोषण, वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातील मानवी हस्तक्षेप आदींमुळे जैवविविधतेची हानी होत आहे. यामुळे येत्या २५ वर्षांत पृथ्वीवरील प्रजातींपैकी २ ते ८ टक्के प्रजाती नामशेष होतील, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केल्याचे माहिम येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाने केलेल्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र निसर्ग उद्यानाने जैवविविधतेचा आढावा घेत वनस्पतींसह वन्यप्राणी नामशेष होण्याच्या घटकांचा अभ्यास करीत प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, वाढत्या लोकसंख्येमुळे वने, गवताळ प्रदेश, कुरणे, पाणथळ प्रदेशांचे रूपांतर शेत जमीन व वसाहतींमध्ये वेगाने होत आहे. परिणामी, परिसंस्थांचे क्षेत्र कमी होत असून, प्रजातींच्या संगठनेत बदल होत आहे.
वाघांच्या संख्येत घट
जमिनीच्या वापरातील बदल हे प्रमुख कारण चित्ता नामशेष होण्याचे आहे.
वनक्षेत्राचा वापर अन्य कारणांसाठी होत असल्याने वाघांच्या संख्येत घट होत आहे.
दक्षिण भारतातील हत्तींचा अधिवास किमान १० टक्क्यांनी कमी झाला आहे.
औषध तयार करीत असलेल्या उद्योगांकडून वाढत्या मागणीमुळे औषधी वनस्पती धोक्यात येत आहेत.
विकास प्रकल्प जंगलांच्या मुळावर
विकास प्रकल्पांमुळे वने, जंगले नष्ट होत असून, १९५१ ते १९८० या काळात देशात अंदाजे ५ लाख हेक्टर वनक्षेत्राचे रूपांतर नदी प्रकल्पांत करण्यात आले. परिणामी, वनक्षेत्रे पाण्याखाली गेली. नदीच्या पाणलोट क्षेत्रापैकी ६० टक्के क्षेत्र खंडित झाले आहे
मानवामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात
ग्रामीण आणि नागरी परिसरात होणारे बिबट्याचे हल्ले, रानडुकरे व काळविटांमुळे होणारे पिकांचे नुकसान ही अस्तित्वासाठी प्राण्यांकडून सुरू असलेली धडपड आहे. मानव आणि प्राण्यांमधील हा संघर्ष वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातील मानवी हस्तक्षेपामुळे उत्पन्न होतो.
- युवराज पाटील, साहाय्यक कार्यक्रम अधिकारी, महाराष्ट्र निसर्ग उद्यान, माहिम
शहरी विभागातील तलाव किंवा तळी या पाणथळीच्या जागा घरे बांधण्यासह व्यापारी प्रकल्पासाठी वापरण्यात येत आहेत. त्यामुळे पाणथळ क्षेत्र धोक्यात आले आहे. शेती, रस्ते, वसाहती, उद्योगधंदे, जलविद्युत केंद्रांसह अन्य प्रकल्प जैवविविधतेने समृद्ध क्षेत्रात सुरू झाल्याने प्रजातींचे विभाजन होत आहे. इमारतींसाठीचे लाकूड, ठिसूळ लाकूड मिळविण्यासाठी नैसर्गिक वनांचे रूपांतर नीलगिरी, सिल्व्हर ओकच्या एकपीक पद्धतीच्या लागवडीत झाले आहे. माती, पाणी आणि वातावरणातील प्रदूषणामुळे संवेदनशील प्रजातींची संख्या घटत आहे; स्थानिक स्तरावर त्या लोप पावत आहेत.