मुलींच्या NDA प्रवेशाचा मार्ग आणखी सुकर; डिफेन्स करिअर ॲकॅडमीचा स्पेशल क्रॅश कोर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 08:04 AM2021-10-09T08:04:19+5:302021-10-09T08:05:06+5:30
सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, येत्या १४ नोव्हेंबरला होणाऱ्या एनडीए-एनएआयआय- २०२१ परीक्षेसाठी मुलीदेखील पात्र असणार आहेत.
औरंगाबाद : भारतीय सैनिकी सेवेत प्रवेश करून अभिमानास्पद करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी पुण्यातील एनडीए या लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेशाचा मार्ग आता खुला झाला आहे. येत्या १४ नोव्हेंबरला यासाठी प्रवेश परीक्षा होणार आहे. या परीक्षेत मुली यशस्वी व्हाव्यात यासाठी डिफेन्स करिअर ॲकॅडमीने (डीसीए) युवक-युवतींसाठी ऑनलाइन स्पेशल क्रॅश कोर्स सुरू केला आहे.
९ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत तज्ज्ञ प्रशिक्षकांचे सखोल मार्गदर्शन, परिपूर्ण अभ्यास व सर्वांगीण तयारीच्या दृष्टीने या क्रॅश कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी dcaaurangabad.org या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन डीसीएचे संचालक प्रा. केदार रहाणे यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, येत्या १४ नोव्हेंबरला होणाऱ्या एनडीए-एनएआयआय- २०२१ परीक्षेसाठी मुलीदेखील पात्र असणार आहेत. १२ वी उत्तीर्ण झालेल्या आणि १२ वीत शिकत असलेल्या मुलींसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. यामध्ये आर्मी विंगसाठी कोणत्याही शाखेत उत्तीर्ण किंवा शिक्षण घेत असलेली उमेदवार, वायुसेना आणि नौदल विंग तसेच इंडियन नेव्हल ॲकॅडमीसाठी विज्ञान शाखेत फिजिक्स, मॅथ्स आणि केमिस्ट्री विषयांसह बारावी उत्तीर्ण किंवा शिक्षण घेत असलेल्या उमेदवार पात्र असतील. त्यामुळे एनडीए प्रवेशासाठी असलेल्या या माेठ्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.