गणवेशासाठी पाहावी लागणार जुलैची वाट
By Admin | Published: June 21, 2016 12:46 AM2016-06-21T00:46:12+5:302016-06-21T00:46:12+5:30
महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच गणवेश मिळणे अपेक्षित असताना यंदा गणवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना जुलैची वाट पाहावी लागणार
पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच गणवेश मिळणे अपेक्षित असताना यंदा गणवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना जुलैची वाट पाहावी लागणार आहे. निविदा प्रक्रियेतील ठेकेदाराने न्यायालयामध्ये धाव घेतल्याने गणवेश मिळण्यास उशीर झाल्याचे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरामध्ये महापालिका शिक्षण मंडळाच्या ३१० शाळा असून, त्यामध्ये ९० हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये प्रामुख्याने कष्टकरी, मजूर तसेच अल्प उत्पन्न गटातील मुले-मुली शिक्षण घेत आहेत. त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांपेक्षा ते कुठेही कमी राहू नये याकरिता शिक्षण मंडळाकडून या विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, रेनकोट, स्वेटर दप्तर, वह्या, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध करून दिले जाते. मात्र अनेकदा साहित्य वेळेवर पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.
शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा याकरिता शिक्षण मंडळाने खूप अगोदर निविदा प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या एका ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतल्याने निविदा प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे गणवेशाची वर्क आॅर्डर निघण्यास उशीर झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यात शिक्षण मंडळाकडून मफतलाल यांना गणवेशाची वर्क आॅर्डर देण्यात आली आहे. शिक्षण मंडळाच्या शाळांमधील ९० हजार विद्यार्थ्यांना गणवेशाचा पुरवठा करायचा असल्याने त्यासाठी ठेकेदाराने १ जुलैपर्यंतची मुदत शिक्षण मंडळाकडे मागितली आहे. वर्क आॅर्डर एक महिन्यापूर्वी मिळाली असती तर ठेकेदाराला गणवेशाचा वेळेत पुरवठा करणे शक्य झाले असते. सध्या १५ हजार गणवेश ठेकेदाराकडून शिक्षण मंडळाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित गणवेश जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुरविले जाणार आहेत.
वह्या, पुस्तके, बूट, दप्तर आदी इतर साहित्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर गणवेशही लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत, याकरिता प्रयत्न करण्यात येत असल्याचे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षण मंडळाकडून शैक्षणिक साहित्याची केली जाणारी खरेदी सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत
आली आहे. सततच्या वादामुळे शिक्षण मंडळाचे सर्व अधिकार काढून घेण्याची कारवाई राज्य शासनाकडून केली गेली होती. मागील वेळेस स्वेटर खरेदीमध्ये अनियिमितता आढळून आल्याने आयुक्तांनी शिक्षणप्रमुखांना कार्यमुक्त केले, तर इतर ४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई केली होती. (प्रतिनिधी)
1महापालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांना रेनकोट पुरविण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतील सर्व ठेकेदारांचे रेनकोट चाचणीमध्ये फेल ठरले आहेत. त्यामुळे तातडीने पुन्हा निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. मात्र, पावसाळा सुरू झाला असताना रेनकोट मिळण्यास आणखी प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे.2वह्या, पुस्तके, बूट, दप्तर आदी इतर साहित्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे़
गणवेश लवकर देण्यासाठी प्रयत्न सुरू
निविदा प्रक्रियेतील ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गणवेशाची वर्क आॅर्डर देण्यास उशीर झाला. पंधरा दिवसांपूर्वी ही वर्क आॅर्डर काढण्यात आली आहे. सध्या १५ हजार विद्यार्थ्यांचे गणवेश प्राप्त झाले असून, उर्वरित गणवेश १ जुलैपर्यंत मिळणार आहेत. इतर साहित्य वह्या, पुस्तके, दप्तर, बूट यांचे विद्यार्थ्यांना वाटप केले जात आहे.
- वासंती काकडे, अध्यक्षा, शिक्षण मंडळ