हीच तर ‘श्रीं’ची इच्छा...
By admin | Published: June 9, 2017 02:09 AM2017-06-09T02:09:39+5:302017-06-09T02:09:39+5:30
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी ‘लोकमत व्यासपीठ’मध्ये व्यक्त केले.
- सचिन लुंगसे
जलयुक्त शिवारसाठी ६७.५० कोटी, ट्रॉमा केअर सेंटरसाठी १ कोटी २५ लाख, डायलिसिस मशीन जिल्हा आणि ग्रामीण स्तरावर १०२ ठिकाणी, अकरावी ते पंधरावीपर्यंतच्या २५ हजार विद्यार्थ्यांना पुस्तके, आत्महत्याग्रस्त शेतकरी वर्गाच्या मुलांना मदत, लहान मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी आठ कोटी, शंभर स्मार्ट व्हिलेजसाठी मदतीसह ‘ग्रीन टेम्पल’ या गोष्टी व्हाव्यात हीच ‘श्रीं’ची इच्छा होती, असे प्रांजळ मत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी ‘लोकमत व्यासपीठ’मध्ये व्यक्त केले. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्य क्षेत्रातील सिद्धिविनायकाचे स्थान नमूद करतानाच येत्या अंगारकीला सिद्धिविनायकाच्या दर्शनाला तब्बल २० लाख भाविक येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येत्या अंगारकीची तयारी कशा रीतीने करण्यात आली आहे?
१३ जून रोजीच्या अंगारकीसाठी सिद्धिविनायक मंदिर सज्ज आहे. अंगारकी पावसाळ्यात आल्याने भाविकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. पावसाळी शेडचे काम हाती घेण्यात आले आहे. मंदिरालगतचे मैदान एमएमआरसीने बांधकामासाठी ताब्यात घेतले असले तरी भाविकांच्या रांगेसाठीची व्यवस्था करण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात नारळ नेण्याबाबत पोलिसांनी निर्बंध लादले आहेत. मंदिरातील नारळाचा प्रश्न नाही. मात्र बाहेरून आणण्यात येणाऱ्या नारळावर निर्बंध होते. काही संघटनांनी नारळाविषयी मुद्दा उपस्थित केला होता. मात्र याबाबतचा निर्णय सर्वस्वी पोलिसांवर अवलंबून आहे.
ट्रस्टच्या सामाजिक कार्याबद्दल काय सांगाल?
ट्रस्टकडून जलयुक्त शिवारसाठी २७ कोटी दिलेत. ट्रॉमा केअर सेंटरचे काम सुरू असले तरी शासनाची मंजुरी अद्याप आलेली नाही; यासाठी १ कोटी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. डायलिसिस मशीन जिल्हा आणि ग्रामीण स्तरावर १०२ ठिकाणी देण्यात येणार आहेत; मात्र शासनाकडून अद्याप याची खरेदी होणे बाकी आहे. शैक्षणिक मदतीचा विचार करता विदर्भ, मराठवाड्यातून कमी प्रतिसाद मिळतो. राज्यातील सर्व विभागांतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भात ही रक्कम शिल्लक राहत असल्याने तेथील गरजू विद्यार्थ्यांना मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
आरोग्य क्षेत्रातील साहाय्याबाबत काय सांगाल?
हृदयशस्त्रक्रिया, मेंदू शस्त्रक्रिया, लहान मुलांवरील शस्त्रक्रिया याबाबत ट्रस्टकडून मदत दिली जाते. गरीब आणि गरजू रुग्णांवरील उपचारासाठी १२ कोटी खर्चाची तरतूद आहे. ही मदत १४ कोटींपर्यंत जाईल, अशी आम्हाला आशा आहे. दरम्यान, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातून मदतीसाठी कमी अर्ज येतात. आता मदतीसाठीचे अर्ज आॅनलाइन किंवा मेलवर मागविण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. वैद्यकीय मदतीसाठी वेगळा मेल आयडी बनविला आहे.
शैक्षणिक उपक्रम कोणते सुरू आहेत?
ट्रस्टकडून अभ्यासिका चालविली जाते. आम्ही तब्बल बाराशे अॅडमिशन देतो. वातानुकूलित वाचनालय आहे. ही सेवा अत्यंत अल्पदरात पुरविली जाते. ट्रस्टचे डिजिटल ग्रंथालय आहे. अंधांसाठी ब्रेलचा पर्याय उपलब्ध आहे. तथापि, अंध बांधवांचा प्रतिसाद कमी आहे. महापालिकेने ग्रंथालयासाठी मंदिरालगतच तीन मजली इमारत दिली आहे.
महापालिकेची मदत कशाप्रकारे मिळते?
डायलिसिस केंद्राच्या इमारतीच्या जागेसाठी महापालिकेला प्रस्ताव दिले आहेत. परवानगी घेण्याचे काम सुरू आहे. डायलिसिसचे एक सेंटर वाडिया आणि दुसरे केईएमला सुरू आहे. साबू सिद्दिकी रुग्णालयाच्या सोयी-सुविधांसाठी ३२ लाखांची तरतूद केलेली आहे. महापालिकेकडून आॅटिझम सेंटरसाठी जागेची मागणी केलेली आहे. मिरजला सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णालय सुरू होत आहे. गोवा हायवेला जागा मिळाली तर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासाठीही ट्रस्ट इच्छुक
आहे.
आपत्कालीन प्रसंगांमध्ये कशी मदत केली जाते?
शंभर स्मार्ट व्हिलेजसाठी मदत करण्याबाबत ट्रस्टचा विचार सुरू आहे. नाम फाउंडेशनच्या शेतकरी हितासाठीच्या उपक्रमांसाठी २ कोटींची तरतूद केलेली आहे, शेतकऱ्यांना उपयोगी ठरणाऱ्या उपकरणांची खरेदी प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीसाठी साडेचार कोटींची तरतूद आहे. त्यानुसार ट्रस्टकडून मदत करण्यात येते. उत्तराखंड प्रलयादरम्यान ५० लाख मदत दिली होती. गुजरात भूकंपावेळी २५ लाख मदत दिली होती. माळीणसाठी ५० लाख दिले होते. रायगड दुर्घटनेवेळी ५ कोटींची मदत केली होती.
देशातील पहिले ‘ग्रीन टेम्पल’ : सिद्धिविनायक मंदिराला ‘ग्रीन टेम्पल’ म्हणून मान्यता मिळाली आहे. हा सन्मान मिळवणारे सिद्धिविनायक देशातील पहिले मंदिर आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पासह सोलार एनर्जीचा
उपक्रम सक्षमपणे राबविण्यात येत आहे. मंदिर परिसरात टेरेस गार्डन आहे. पुरेशी प्रकाशयोजना आहे. फुलांचा पुनर्वापर केला जातो. सिद्धिविनायकचा प्रसाद असलेला लाडू शंभर टक्के केमिकल फ्री आहे. दहा वर्षांत एकदाही लाडूची किंमत वाढविलेली नाही. अन्न व औषध प्रशासन व दिल्लीच्या ‘एसएसएआय’ने या लाडूला मान्यता दिली आहे. नारळाची करवंटी आणि उर्वरित भागाचा पुनर्वापर केला जातो. सिद्धिविनायकासाठी वापरला जात असलेला शेंदूर हा पूर्णत: नैसर्गिक आणि केमिकल फ्री असून, मंदिराचे संकेतस्थळ पूर्णत: सुरक्षित असल्याचेही संजीव पाटील यांनी या वेळी सांगितले.