मरावे परि अवयवरूपी उरावे..! राज्यात ३ हजार जणांनी केला अवयवदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 04:48 AM2017-09-09T04:48:43+5:302017-09-09T04:49:02+5:30
‘मरावे परि कीर्तिरूपी उरावे’ असे म्हणतात. कालपरत्वे यात बदल होत आहे. अवयवदान केल्यास मरणानंतरही अवयवदानाच्या रूपात जिवंत राहता येते, हे आता अनेकांच्या लक्षात आले आहे.
मुंबई : ‘मरावे परि कीर्तिरूपी उरावे’ असे म्हणतात. कालपरत्वे यात बदल होत आहे. अवयवदान केल्यास मरणानंतरही अवयवदानाच्या रूपात जिवंत राहता येते, हे आता अनेकांच्या लक्षात आले आहे. त्यातच अवयवदान जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. नुकत्याच राज्यात पार पडलेल्या महाअवयवदान मोहिमेअंतर्गत तीन हजार जणांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे.
या मोहिमेअंतर्गत अवयवदानाविषयी विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विज्ञापीठ, नाशिक यांनी राबविलेल्या मोहिमेमधून सर्वाधिक म्हणजेच १ हजार २१ लोकांनी अवयवदानासाठी नोंदणी केली आहे. विविध रुग्णालयांसह जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही अवयवदानासाठी पुढाकार घेत जनजागृतीचे आवाहन केले होते.
या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अवयवदानात महाराष्ट्र राज्य देशात दुसºया क्रमांकावर आहे. यापूर्वी ते सहाव्या क्रमांकावर होते. अवयवदान जनजागृतीसाठी राज्यपातळीवर तसेच शहरांसोबतच गाव पातळीवरही मोहीम राबविण्यात आली. अवयवदानासाठी लोकसहभाग वाढावा यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालनालयांतर्गत ही महाअवयवदान मोहीम राबवण्यात आली.