रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 06:17 AM2024-05-22T06:17:21+5:302024-05-22T06:18:12+5:30
परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. निकालात यंदा कोकण विभाग आघाडीवर राहिला, तर मुंबईचा शेवटचा क्रमांक लागला.
मुंबई /पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत त्यात २.१२ टक्के वाढ झाली आहे. परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. निकालात यंदा कोकण विभाग आघाडीवर राहिला, तर मुंबईचा शेवटचा क्रमांक लागला.
६,९८६ दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ५८१ म्हणजेच ९४.२० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४० हजार ७९५ खासगी विद्यार्थ्यांपैकी ३४ हजार ९८८ (८५.७६%), तर ४५ हजार ०८३ पुनर्परीक्षार्थींमधून २२ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी तनिषा बाेरामणीकर हिने ६०० पैकी ६०० गुण घेत बारावीच्या निकालात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तनिषाला लेखी परीक्षेत ६०० पैकी ५८२ गुण आणि खेळाचे १८ गुण असे एकूण ६०० गुण मिळाले. १०० टक्के घेणारी तनिषा कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून एकमेव असल्याचेही स्पष्ट झाले.
नाउमेद होऊ नका; पुन्हा परीक्षेची तयारी करा
पुणे : बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेले सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे अभिनंदन. जे विद्यार्थी यशस्वी झाले नाहीत त्यांनी नाउमेद हाेऊ नये. ही परीक्षा म्हणजे जीवनाची अंतिम परीक्षा नाही त्यामुळे निराश न हाेता पुढील परीक्षेसाठी चांगली तयारी करावी, असे आवाहन राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले.
यंदा प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षेचे गुण ओएमआर शीटवर न घेता ऑनलाइन पोर्टलद्वारे घेतल्याने निकाल लवकर जाहीर करता आल्याचे ते म्हणाले.
मुंबईचा निकाल ३.८२ टक्क्यांनी वाढला तरी...
इतर विभागीय मंडळांच्या तुलनेत मुंबई विभागीय मंडळाचा बारावीच्या निकाल सर्वांत तळाला असला तरी त्यामध्ये ३.८२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी ८८.१३%
असलेला मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमधील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या विभागाचा निकाल यंदा ९१.९५% आहे.
यंदाही मुलींचीच बाजी
राज्यात बारावी परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण ९५.४४, तर मुलांचे ९१.६० टक्के आहे. मुलींचा निकाल ३.८४ टक्के जास्त आहे.
विद्यार्थ्यांना किती गुण?
८,७८२ ९०%
१,९०,५७० ७५%
४,८०,६३१ ६०%
५,२६,४२५ ४५%
१,३२,०५८ ३५ ते ४५%
बारावी परीक्षेला बसलेले विद्यार्थी
मुले : ७,६६,६५१
उत्तीर्ण : ७,०२,२९६
मुली : ६,५७,३१९
उत्तीर्ण ६,२७,३८८
३१३ कॉपी प्रकरणांची नाेंद
nपरीक्षेत कॉपी केल्याप्रकरणी ३१३ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक १४३ प्रकरणे छत्रपती संभाजीनगर मंडळात घडली आहेत.
nयासह १३९ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत आक्षेपार्ह लेखन केल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात २१ कनिष्ठ महाविद्यालये आणि संस्थांचा शून्य टक्के निकाल लागला आहे.
बारावीच्या निकालात कोकण विभाग राज्यात पहिला, तर मुंबई शेवटून पहिला
कोकण ९७.५१
नाशिक ९४.७१
पुणे ९४.४४
कोल्हापूर ९४.२४
छत्रपती संभाजीनगर ९४.०८
अमरावती ९३.००
लातूर ९२.३६
नागपूर ९२.१२
मुंबई ९१.९५