धनगर आरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध
By admin | Published: January 9, 2015 01:46 AM2015-01-09T01:46:23+5:302015-01-09T01:46:23+5:30
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे धनगर समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत;
नाशिक : मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे धनगर समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत; परंतु हे आरक्षण देताना आदिवासींच्या ७ टक्के आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता ते देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी येथे केले़
भाजपाच्या संघटन पर्वाअंतर्गत अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने आयोजित प्रदेश पातळीवरील कार्यशाळेनिमित्त शहरात आलेले सवरा पत्रकारांशी बोलत होते़ सावरा म्हणाले, आदिवासी कायद्याच्या कक्षेत धनगर समाज बसत नाही़ धनगर ही जमात आदिवासींमध्ये नाही़ आदिवासींमध्ये धनगड ही आदिवासी जमात आहे; परंतु याचे नामसाधर्म्य साधून धनगर समाजाला आदिवासींमध्ये बसविता येणार नाही़ याबाबत मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेण्यात येईल़
आदिवासी विभागाचा मोठा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यावा लागतो़ परंतु कामांची गती व गुणवत्ता पाहिजे तशी नसते यामुळे आदिवासी विभागाअंतर्गतच बांधकाम विभाग सुरू करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, असे ते म्हणाले.
मुंबईला पाणी देण्यापूर्वी स्थानिकांना प्राधान्य
त्र्यंबक तालुक्याच्या सीमेवरील पिंजाळ नदीवरील प्रकल्प पूर्ण करून त्याचे पाणी मुंबईला पुरविण्यात येणार आहे़ या प्रकल्पाला केंद्रीय जलसंधारणमंत्री उमा भारती यांनी बुधवारी मंजुरी दिली आहे़ याबाबत आदिवासीमंत्री सवरा म्हणाले, या प्रकल्पाचा मूळ उद्देश नाशिक व ठाणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांचा पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्याचा होता़ आता या प्रकल्पाचे पाणी मुंबईला जाणार असले तरी प्राधान्याने स्थानिकांचा पाण्याचा प्रश्न मिटवून नंतरच पाणी मुंबईला दिले जाईल़, असे त्यांनी सांगितले.