जगात भारी आम्ही कोल्हापुरी
By Admin | Published: June 27, 2017 01:31 AM2017-06-27T01:31:23+5:302017-06-27T01:31:23+5:30
काय भावा कवा येनार हाईस... हे फोनवरून मित्राचे रांगडी शब्द कानावर पडले आणि झरझर डोळ्यांसमोर आठवणी झरू लागल्या त्या माझ्या आजोळच्या. छत्रपती शाहू महाराजांच्या राजधानीच्या
काय भावा कवा येनार हाईस... हे फोनवरून मित्राचे रांगडी शब्द कानावर पडले आणि झरझर डोळ्यांसमोर आठवणी झरू लागल्या त्या माझ्या आजोळच्या. छत्रपती शाहू महाराजांच्या राजधानीच्या, कुस्तीवीरांच्या पंढरीच्या, साडेतीन पीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या करवीर नगरीच्या म्हणजेच आपल्या कोल्हापूरच्या. का जावं कोल्हापूरला? काय आहे तिथे? असे अनेक प्रश्न डोक्यात घेऊन कोल्हापूरला नेहमी जातो; पण येताना खूप साऱ्या सुखद आठवणी घेऊन परतीचा प्रवास करतो. इथल्या माणसांपासून दगडधोंड्यांपर्यंत सगळ्याच गोष्टींत निराळेपण ठासून भरलंय.
महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असणारं महालक्ष्मीचं प्राचीन मंदिर जसं भक्तांना देवीच्या दर्शनाच्या ओढीनं आपल्याकडं खेचून घेतं तसंच ते स्थापत्यशास्त्रज्ञांना स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून आकर्षित करतं. महालक्ष्मीच्या म्हणजेच आंबाबाईच्या मंदिरात नवरात्र उत्सवात जाणं म्हणजे पर्वणीच. आजही राजेशाही थाटात होणारा दसरा महोत्सव एकदातरी प्रत्येकाने पाहावाच.
या ऐतिहासिक नगरीत शालिनी पॅलेस, नवा राजवाडा, भवानी मंडप यांसारख्या अनेक छत्रपतीकालीन वास्तू मोठ्या थाटात आणि तितक्याच सुस्थितीत आपल्या भक्कमतेचा पुरावा देत डामडौलात उभ्या आहेत. इथे आल्यावर पाहिलाच पाहिजे तो ‘रंकाळा तलाव’ आणि आत्ताची कोल्हापूरची चौपाटी. कोल्हापुरात गेलात तर शहरापासून काही अंतरावर असणारा शिव छत्रपतींच्या थरारक इतिहासाची आणि शौर्याची गाथा सांगणारा पन्हाळगड पाहायला विसरू नका. बाजी प्रभूंच्या पराक्रमाची साक्ष असणारी पावनखिंड आणि जवळचा विशाळगडसुद्धा तुम्हाला इतिहासाची उजळणी करून देईल. कोल्हापूरच्या पर्यटनाचा मुख्य भाग असलेल्या राधानगरीच्या अभयारण्यात मुक्त संचार करणारे अगडबंब गवे जवळून पाहताना अंगावर काटा येतो. अन्य प्राणी आपल्याला इथे पाहायला मिळतील. अशा अनेक गोष्टी तुम्हाला दिसतील, अनुभवता येतील. यासाठी तरी एकदा कोल्हापूरला जाऊनच या. येताना सुमधुर आठवणींबरोबर आंबाबाईचा आशीर्वाद नक्कीच घेऊन याल आणि ‘जगात भारी आम्ही कोल्हापुरी’ असं कोल्हापूरकर का म्हणतो याची प्रचिती येईल.
- निशांत प्रल्हाद विद्या सरदेसाई