आम्ही निष्पाप आहोत - भुजबळ
By admin | Published: February 10, 2016 04:42 AM2016-02-10T04:42:26+5:302016-02-10T04:42:26+5:30
‘आम्ही निष्पाप आहोत... पळून जाण्याचा प्रश्नच येत नाही... आम्ही चौकशीत पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. मात्र, चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला क्लीन चिट दिली
मुंबई : ‘आम्ही निष्पाप आहोत... पळून जाण्याचा प्रश्नच येत नाही... आम्ही चौकशीत पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. मात्र, चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला क्लीन चिट दिली, म्हणून त्यांच्या बदल्या करणे, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणे अशा गोष्टी चालू आहेत. अधिकाऱ्यांना माफीचा साक्षीदार करतो, म्हणून घाबरवले जात आहे. मीसुद्धा चौकशी समितीला हव्या त्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे,’ अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली.
अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या भुजबळ यांचे दुपारी मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तेथून गाड्यांचा ताफा नरिमन पॉइंट येथील राष्ट्रवादी भवन येथे आला. तेथे अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त होता. पूर्ण तयारीनिशी पत्रकार परिषदेत आलेल्या भुजबळांंनी एकाही राजकीय प्रश्नाला उत्तर दिले नाही. आपण निष्पाप आहोत, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत, यापलीकडे ते काहीही बोलण्याच्या तयारीत नव्हते. आपल्यामागे भाजपाचे केंद्रातील नेते लागले आहेत की राज्यातील, या प्रश्नावरही माझ्यामागे कोणीही लागले नाही, सगळे माझ्या पाठीशी आहेत, असे तिरकस उत्तर त्यांनी दिले.
‘राज्यात १ फेब्रुवारीपासून बऱ्याच गोष्टी घडू लागल्या. मी ३१ जानेवारीच्या रात्री वॉशिंग्टनला रवाना होताच, मी ऐन वेळी निघून गेलो, पळून गेलो, अशा चर्चा झाल्या. मी परतणारच नाही, असेही सांगितले गेले. मला २५ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या मेंबर्स आॅफ कॉमर्सने तेथे येण्याचे निमंत्रण दिले होते. तेथे ३ दिवसांचे अधिवेशन होते. त्यासाठी १४० देशांचे प्रतिनिधी येणार होते आणि ४ फेब्रुवारी रोजी तेथे बराक ओबामा येणार असल्याचेही पत्र मला आले. खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधी असा सगळ्यांचा त्यात सहभाग होता. मीही सहभागी झालो होतो,’ असे सांगत त्यांनी कार्यक्रम पत्रिकाच दाखवली.
अतिरिक्त मुख्य सचिवांनी क्लीन चिट दिली!
‘सरकारने घेतलेले निर्णय तुमच्यासमोर आहेत. सगळ्या फायली तुमच्याकडे आहेत. कलिना आणि महाराष्ट्र सदन प्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिवांसह अनेक अधिकारी व खुद्द बांधकाममंत्र्यांनी मला क्लीन चिट दिली. यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी सहा महिने चौकशी केली, नंतर ही क्लीन चिट दिली. तरीही एका रात्रीत नागपुरात बसून हा अहवाल बदलला गेला आणि ती क्लीन चिट नाही असे सांगण्यात आले. त्यातल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या, तर काहींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. काहींना माफीचा साक्षीदार व्हा, पण आम्ही सांगतो ते कबूल करा, असा दम दिला गेला. अधिकारीदेखील अटकेला घाबरतात, म्हणून हे चालू आहे,’ असा जोरदार आरोप भुजबळ यांनी केला.
...तर तेव्हाच पळून गेलो असतो!
‘मी या अधिवेशनाविषयी शरद पवार यांच्याशीही चर्चा केली होती. मी अशा कार्यक्रमांना जायला पाहिजे, असे त्यांनी सांगितल्याने मी गेलो. जूनमध्येच एफआयआर दाखल झाला होता. आता फेब्रुवारी आहे. पळून जायचे असते, तर तेव्हाच गेलो असतो. एसीबीकडे चौकशी चालू असताना मी तीन वेळा पाच-सहा तास चौकशीस गेलो. अधिकारी, पंकज, समीरही गेले. चौकशीत पूर्ण सहकार्य करत होतो. दरम्यान, ईडीने ईसीआर नोंदवला. महाराष्ट्र सदन, कलिनाप्रकरणी एफआयआर दाखल झाले, असे भुजबळ म्हणाले.