'स्थगिती अन् चौकशांना आम्ही घाबरत नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 04:05 AM2020-02-24T04:05:47+5:302020-02-24T04:06:05+5:30
फडणवीस यांचे सरकारला आव्हान
मुंबई : विसंवादी, स्थगिती आणि चौकशी सरकारला घाबरत नाही, खुशाल चौकशी करा, असे आव्हान देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी यावरून सरकारला विधिमंडळ अधिवेशनात विरोधक घेरणार असल्याचा पवित्रा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.
‘महाविकास आघाडी सरकारची दिशाही ठरत नाही आणि सरकारला सूरही गवसत नाही. मुख्यमंत्री अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांना सुसंवादासाठी बोलावतात, पण सत्तेतील तीन पक्षांमध्येच संवाद नाही, आधी तो साधा, असा सल्ला देत चहापानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत’, असे फडणवीस यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले.
दिसेल त्या कामाला स्थगिती देणारे हे सरकार आहे. जलयुक्त शिवार योजना सरकार बंद करेल, पण जनता ती बंद होऊ देणार नाही. ही योजना, वृक्षलागवडीची खुशाल चौकशी करा, घाबरतो कोण? दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी
फसवी आहे. शेडनेट, पशुपालनाचे कर्ज माफ केलेले नाही. आम्ही ते केले होते. महिलांवरील अत्याचार पराकोटीला गेले आहेत. पोलिसांचे मनोधैर्य खचले आहे. गुन्हेगारी वाढली आहे त्याविरुद्ध आम्ही आवाज उठवू. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. 'शिदोरी' मासिकावर कारवाई करावीच लागेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिकाच काढायची असेल तर १९९९ पासून २०१९ पर्यंतच्या आर्थिक स्थितीवर काढा, कोणी काय केले ते समोर येईल, असे आव्हान फडणवीस यांनी दिले.
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यावर सातत्याने काँग्रेसकडून टीका करण्यात येत आहे. गांधी घराण्यातील कोणावर टीका झाली तर शिवसेनेकडून पाच मिनिटात माफी मागण्यात येते. मात्र सावरकरांबाबत काँग्रेसकडून सातत्याने टीका करण्यात आली तरी शिवसेना त्याबाबत काहीच बोलत नाही, सत्तेसाठी किती दिवस विचारांशी तडजोड करणार असा सवालही फडणवीस यांनी केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे आदी उपस्थित होते. रासपचे महादेव जानकर वा रिपाइंकडून कोणीही हजर नव्हते.
पवारांवर साधला निशाणा
एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरण एकच आहे हे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या वक्तव्यातून बुद्धिभेद आहेत. कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी यामध्ये हिंदुत्ववाद्यांचा हात असल्याबाबत आरोप केले होते.आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासामधून त्यांच्या या विधानाला छेद मिळत आहे.त्यामुळे ते अशी विधाने करून दलित समाजामध्ये गोंधळ निर्माण करू पाहत आहेत असा निशाणा फडणवीस यांनी साधला.
मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय लोकसंख्या सूची कायद्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचे फडणवीस यांनी स्वागत केले. एल्गार प्रकरणी तपास एनआयएकडे सोपवण्याच्या निर्णयाचेदेखील फडणवीस यांनी स्वागत केले.