'...तर मी कोऱ्या चिठ्ठीवर सही करून राजीनामा लिहून देतो'; मंत्री लोढा यांचं दानवेंना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 04:59 PM2023-12-20T16:59:11+5:302023-12-20T17:00:02+5:30
आम्ही कोणतेही चुकीचे काम करत नाही, असं मंत्री लोढा यांनी सभागृहात सांगितले.
नागपूर: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री आणि भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर भ्रष्टचाराचा आरोप केला. लोढा यांच्याविरोधात आमच्याकडे तक्रारी येत आहेत, असंही अंबादान दानवे म्हणाले. यानंतर लोढा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आपण कोणतेही चुकीचे काम करत नसल्याचे सांगत आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करण्याचे थेट आव्हान दिले आहे. अंबादास दानवे यांनी सभागृहात बोलताना पुराव्याशिवाय आरोप केल्यानंतर, काही चुकीचं केलं असेल तर थेट कोऱ्या कागदावर सही करून राजीनामा देत असल्याचं मंगल प्रभात लोढा यांनी जाहीर केलं.
मंत्री लोढा म्हणाले, मी अनेक वर्षांपासून माझ्या कुटुंबाच्या व्यवसायात नाही. जर माझ्या कुटुंबियांकडून अवैध व्यवसाय होत असेल तर मी कोऱ्या चिठ्ठीवर सही करून राजीनामा लिहून देतो. आम्ही एकही अनधिकृत बांधकाम केले नाही. आम्ही अनधिकृत व्यवसाय करत नाही. पदाचा मी गैरवापर करत नाही. तुम्ही पुरावे द्या, ते घेण्यासाठी मी स्वतः येतो. हे जे काही चाललंय ते बरोबर नाही. कोणाच्या कुटुंबाने व्यवसाय नोकरी काही करायचाच नाही का? बेरोजगार बसून राहायचा का? माझं काम अतिशय पारदर्शक आहे, कुणी १ रूपयाचा माझ्यावर आक्षेप घेऊ शकत नाही, असं लोढा यांनी सांगितले.
चुकीच्या आरोपांना दिलेले प्रत्युत्तर!
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) December 20, 2023
गेल्या 30 वर्षांपासून मी या विधानसभेचा सदस्य आहे. मी कधीही माझ्या पदाचा दुरुपयोग केला नाही. परंतु आपण सरकारमध्ये असताना आपल्या घरातील सदस्यांनी कोणती नोकरी किंवा व्यवसाय करायचा नाही का? एखाद्याच्या कुटुंबावर आक्षेप घेणे अत्यंत चुकीचे आहे.… pic.twitter.com/PjO7BQipkm