शिवसेना-भाजप एकत्र येणार का?; फडणवीसांचं अतिशय सूचक विधान अन् चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 07:10 PM2021-07-04T19:10:31+5:302021-07-04T19:12:31+5:30
शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं सूचक उत्तर
मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांच्यामध्ये एक गुप्त भेट झाल्याची माहिती काल पुढे आली. त्यानंतर शिवसेना-भाजप युतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दिल्लीतील भेट, त्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर होत असलेले गंभीर आरोप या पार्श्वभूमीवर राऊत आणि शेलार यांच्या भेटीचं वृत्त आल्यानं चर्चेला उधाण आलं. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत एक महत्त्वाचं विधान केलं.
आशिष शेलार आणि संजय राऊत यांच्या भेटीमुळे शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. याबद्दल फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिवसेना आणि आमच्यात शत्रुत्व नाही. पण वैचारिक मतभेद आहेत, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. 'राऊत आणि शेलार यांच्या भेटीबद्दल मला काही कल्पना नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देण्याची आमची पूर्ण तयारी आहे,' असंदेखील फडणवीस पुढे म्हणाले.
'शिवसेना आणि भाजप यांच्यात शत्रुत्व नाही. मात्र आमच्यात वैचारिक मतभेद नक्कीच आहेत. शिवसेनेनं निवडणूक आमच्यासोबत लढवली. मात्र निवडणुकीनंतर शिवसेनेनं आमचा हात सोडला आणि ज्यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली, त्यांच्याच हात धरला. शिवसेना आणि आमच्यामध्ये वैयक्तिक स्वरुपाचा वाद नाही. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत,' असं फडणवीस यांनी सांगितलं.
शिवसेनेनं पुन्हा हात दिला, तर त्यांना सोबत घेणार का, असा सवाल फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर राजकारणात जर-तर असं काही नसतं, असं फडणवीस म्हणाले. राजकारणात जे जर-तर वर राहतात, ते केवळ स्वप्नच पाहतात, राजकारणात परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात, असं अतिशय सूचक विधान त्यांनी केलं. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचा सल्ला मी फडणवीसांना दिला होता, असं विधान आठवलेंनी केलं होतं. त्यावर आठवलेंनी योग्यवेळी योग्य सल्ला ऐकला असता, तर ते मुख्यमंत्री झाले असते, असा टोला त्यांनी लगावला.