Raj Thackeray : आपण सत्तेपासून दूर नाही, हे मळभ लवकरच दूर होईल - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 09:05 PM2023-03-09T21:05:33+5:302023-03-09T21:18:53+5:30
Raj Thackeray : मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या आतापर्यंतच्या आंदोलनाची माहिती देणारी पुस्तिका जारी केली. यात मनसेच्या आतापर्यंतच्या सर्व आंदोलनाची सविस्तर माहिती दिली आहे.
ठाणे : अनेक गोष्टीतून पक्ष जात असतो. आपण सत्तेपासून आपण दूर नाही आहोत, हे मळभ लवकरच दूर होईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या आतापर्यंतच्या आंदोलनाची माहिती देणारी पुस्तिका जारी केली. यात मनसेच्या आतापर्यंतच्या सर्व आंदोलनाची सविस्तर माहिती दिली आहे.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, "गेल्या १७ वर्षांपासून कार्यकर्त्यांनी मोठी साथ दिली, मनसैनिकांचे सहकार्य मिळाले, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. कित्येक लोकांनी खस्ता खाल्या, कष्ट केलेत, त्यानंतर भाजपला देशभरात सत्ता मिळाली आहे. १९५२ पासून जनसंघ संघर्ष करत होता. १९५२ ते २०१४ या काळात भाजपने अनेक संकटांचा सामना केला. अनेक गोष्टीतून पक्ष जात असतो. आपण सत्तेपासून आपण दूर नाही आहेत. हे मळभ लवकरच दूर होईल."
याचबरोबर, जेव्हा कधी निवडणुका होऊद्यात, आपणच सत्तेत येणार आहोत. या पक्षांच्या राजकीय तमाशाला जनता कंटाळली आहे. मी भाषणं देईल, कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहाचावे, असे राज ठाकरे म्हणाले. याशिवाय, माझ्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारेही हिंदुत्ववादीच होते, भोंग्यांविरोधातील आंदोलनासाठी मनसैनिकांना तुरुंगात जावे लागले. मशिदींवरील भोंग्यांसाठी आम्ही आंदोलनं केली, पाकिस्तानी कलाकारांना आम्ही भारतातून हाकलले. मग इतर पक्षांचा हिंदुत्ववाद म्हणजे नेमका काय? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
दरम्यान, राज ठाकरे यांनी मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचा उल्लेख केला. याबद्दल बोलताना त्यांनी "ज्यांनी हल्ला केला त्याला आधी समजेल आणि नंतर सर्वांना समजेल, असा सणसणीत इशारा दिला. तसेच पुढे बोलताना त्यांनी माझ्या मुलांचे रक्त असे वाया जाऊ देणार नाही," असे म्हणत त्यांनी पाडव्या मेळाव्यामध्ये बोलणार असल्याचेही सांगितले. यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे यांनी काही पत्रकार जाणून बुजून मनसेच्या बदनामीचा प्रचार करत असतात, असेही ते यावेळी म्हणाले.