आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही, आव्हाडांचा शेलारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 01:45 PM2020-02-03T13:45:57+5:302020-02-03T13:48:22+5:30
आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेल्या विधानावरून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वाद पेटला आहे.
मुंबई - भाजपा नेते आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेल्या विधानावरून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वाद पेटला आहे. सीएएच्या अंमलबजावणीला नकार द्यायला उद्धवच्या बापाचे राज्य आहे का, असे विधान करणाऱ्या शेलार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे. उद्धवच्या बापाचे राज्य आहे का? असे जाहीर विधान करणे आशिष शेलार यांना शोभत नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
आशीष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ''उद्धवच्या बापाचे राज्य आहे का? असे जाहीर विधान करणे आशिष शेलार यांना शोभत नाही.आणि होय, मराठी मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरात मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही आहोत.''
उद्धव च्या बापाचे राज्य आहे का ... असे जाहीर निवेदन करणे @ShelarAshish ह्यांना शोभत नाही ..
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 3, 2020
आणि होय
मराठी माती ला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे ...
आम्ही गुजरात मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही ....
केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व कायद्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकत्व कायद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आशिष शेलार यांनी वादग्रस्त टीका केली होती. नालासोपाऱ्यातील एखा कार्यक्रमात बोलताना शेलार म्हणाले होते की, “शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल. तर CAA हा कायदा केंद्राचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रा हा कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, अशी वादग्रस्त टीका शेलारांनी यावेळी केली.