"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 04:28 PM2024-11-27T16:28:19+5:302024-11-27T16:29:18+5:30
Maharashtra caretaker CM and Shiv Sena chief Eknath Shinde : भाजपच्या वरिष्ठांना ज्या पद्धतीने मोदी आणि अमित शहा यांचा निर्णय अंतिम असतो, तसा आम्हाला देखील तो अंतिम असेल, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत दिले आहेत.
ठाणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर आता कोण मुख्यमंत्री होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत दिले आहेत. मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही करत आहे. मी मुख्यमंत्री समजलो नाही. कॉमन मॅन म्हणून काम केले. नाराज होऊन आम्ही रडणारे नाही. तर जनतेसाठी काम करणारे आहोत. रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करेन, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रातील तमाम मतदार आणि जनतेला धन्यवाद देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाला, ही लँडस्लाईड व्हिक्ट्री आहे. गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळाला नाही. जे काही अडीच वर्षात महायुतीने जे काम केलं, लोकांनी जो विश्वास दाखवला, एकीकडे विकास कामे, जी महाविकास आघाडीने थांबवली होती. ती आम्ही पुढे नेली. त्याचं प्रतिबिंब आज पाहत आहोत. कल्याणकारी योजना आणि विकास याची सांगड घातली. त्यामुळे हा विजय झाला. हा जनतेचा विजय आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
निवडणुकीत महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. मी पहाटे पर्यंत काम करायचो. दोन तीन तास झोपल्यावर माझी सभा असायची. हे चक्र निवडणुकीभर चाललं. मी ८० ते ९० सभा घेतल्या. मी प्रवासही मोठा केला. पायाला भिंगरी लावून कार्यकर्ता काम करतात, तसं मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही करत आहे. मी मुख्यमंत्री समजलो नाही. कॉमन मॅन म्हणून काम केलं. त्यामुळे मला प्रोटोकॉलचा अडथळा येत नव्हता. त्यामुळे जनतेसाठी काही ना काही केले पाहिजे असे वाटत होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
#WATCH | Thane: Maharashtra caretaker CM and Shiv Sena chief Eknath Shinde says, "For the past 2-4 days you must have seen rumours that someone is miffed. We are not people who get miffed...I spoke with the PM yesterday and told him that there is no obstruction from our end in… pic.twitter.com/IvFlgD5WQI
— ANI (@ANI) November 27, 2024
सर्व घटकांसाठी आम्ही काम करत आहोत. माझ्या कामाबद्दल मी समाधानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठबळ दिले, त्यामुळे त्यांचे आभार मानतो. तसेच, आमच्या सरकारने सर्वात जास्त निर्णय घेतले. दीड वर्षात केलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे. या काळात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याकडून मोठा पाठिंबा मिळाला. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशी ओळख निर्माण झाली. त्यामुळे आम्ही नाराज होऊन रडणारे नाही. त्यामुळे मी जे काम करेन, ते महाराष्ट्रातील जनतेसाठी करेन आणि रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करेन, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, बाळासाहेब यांची सर्वसामान्य शिवसेनिक हा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा होती, ती इच्छा मोदी यांनी पूर्ण केली. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो घेतील तो शिवसेना म्हणून आम्हाला सुद्धा मान्य असेल. आमच्यात काही कोंडी, अडचण असे काहीच नाही. भाजपच्या वरिष्ठांना ज्या पद्धतीने मोदी आणि अमित शहा यांचा निर्णय अंतिम असतो, तसा आम्हाला देखील तो अंतिम असेल, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत दिले आहेत.