आम्ही बाहेर अन् नारायण राणे सत्तेत! खडसेंची खंत; कार्यकर्त्यांमुळे पक्ष सत्तेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 02:45 AM2017-10-31T02:45:11+5:302017-10-31T02:45:20+5:30
आणीबाणीत अनेकांनी संघर्ष केला. त्याचे फळ म्हणून आज केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता आहे. मात्र पक्षवाढीसाठी, सत्ता मिळविण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले, ते आज सत्तेबाहेर आहेत आणि नुकताच पक्ष स्थापन केलेले नारायण राणे यांना सत्तेत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी खंत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी येथे व्यक्त केली.
धुळे : आणीबाणीत अनेकांनी संघर्ष केला. त्याचे फळ म्हणून आज केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता आहे. मात्र पक्षवाढीसाठी, सत्ता मिळविण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले, ते आज सत्तेबाहेर आहेत आणि नुकताच पक्ष स्थापन केलेले नारायण राणे यांना सत्तेत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी खंत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी येथे व्यक्त केली.
राजवाडे मंडळाचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा यांनी संपादित केलेल्या ‘आणीबाणी - चिंता आणि चिंतनाचा विषय’ तसेच ‘डॉ़ जे़ के़ वाणी स्मृती विशेषांक’ या दोन पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
खडसे म्हणाले, आणीबाणीत नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावले गेले. देशात पुन्हा लोकशाही रूजावी, नागरिकांना त्यांचे हक्क पुन्हा मिळावेत म्हणून अनेकांनी त्या काळी संघर्ष केला. त्यांनी संघर्ष केला नसता तर आज देशात भाजपाचे १८ मुख्यमंत्री मिळाले नसते. आणीबाणी हा स्वातंत्र्यांचा दुसरा लढाच होता. मात्र आजच्या तरुण पिढीला हा इतिहास माहिती नाही. त्यांच्यापर्यंत तो पोहोचला पाहिजे. यासाठी त्याचा पुस्तकांमध्ये समावेश झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.