आम्ही हिंदुत्ववादीच, पण अन्य धर्मांचा द्वेष नाही - उद्धव ठाकरे
By admin | Published: July 23, 2014 04:18 PM2014-07-23T16:18:19+5:302014-07-23T16:22:48+5:30
आम्ही हिंदुत्ववादी असलो तरी अन्य धर्मांचा आम्ही द्वेष करत नाही. महाराष्ट्र सदनातील गैरकारभाराविषयी शिवसेना खासदारांनी उठवलेला आवाज दाबण्यासाठी हा कांगावा केला जात असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
Next
ऑनलाइन टीम
औरंगाबाद, दि. २३ - आम्ही हिंदुत्ववादी असलो तरी अन्य धर्मांचा आम्ही द्वेष करत नाही. महाराष्ट्र सदनातील गैरकारभाराविषयी शिवसेना खासदारांनी उठवलेला आवाज दाबण्यासाठी हा कांगावा केला जात आहे असे सांगत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांवरील आरोप फेटाळून लावले आहेत.
शिवसेना खासदारांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील कँटिनमधील सुमार सेवेविरोधात आंदोलन करताना कँटिनमधील मुस्लीम कर्मचा-याला जबरदस्तीने चपाती भरवण्याचा प्रयत्न केला. यामुळे संबंधीत कर्मचा-याचा रोजा मोडला व त्या कर्मचा-यांने धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार निवासी आयुक्तांकडे केली. या घटनेचा व्हिडीओ प्रकाशित झाल्यावर शिवसेना खासदारांवर देशभरातून टीकेची झोड उठली होती. काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी लोकसभा व राज्यसभेत सत्ताधा-यांवर टीकाही केली. यापार्श्वभूमीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये या घटनेविषयी प्रतिक्रिया दिली. ठाकरे म्हणाले, शिवसेना दुस-यांच्या धर्मात ढवळाढवळ करत नसून ऐवढ्या खालच्या पातळीवर आम्ही कधी जाणार नाही. शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत.