राज्य बालनाट्य स्पर्धेत ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:43 AM2020-01-21T11:43:10+5:302020-01-21T11:45:19+5:30
सांस्कृतिक संचालनालयाचे आयोजन; सोलापूरच्या ‘उजगोबा’ला तृतीय बक्षीस
सोलापूर : महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये उस्मानाबाद-सोलापूर केंद्रामधून आम्ही सावित्रीच्या लेकी या नाटकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. भूम येथील मुक्ताई बहुउद्देशीय संस्थेने हे नाटक सादर केले होते. संकल्प युथ फाउंडेशनच्या झाडवाली झुंबी या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (उपनगरीय शाखा) उजगोबा या नाटकाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले. या तीनही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धा तीन ते १८ जानेवारी दरम्यान उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आणि सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे झाल्या. स्पर्धेत एकूण ५१ नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून सुरेंद्र केतकर, बाळासाहेब नवले, राजेश दुर्गे यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेचा निकाल :
दिग्दर्शन : प्रथम-पारितोषिक मंगल माळी (आम्ही सावित्रीच्या लेकी), द्वितीय-राधिका खोटे (झाडवाली झुंबी), तृतीय- मिहीका शेंडगे (उजगोबा). प्रकाश योजना : प्रथम - देवदत्त सिद्धम (उजगोबा), द्वितीय- संध्या मरोड (झाडवाली झुंबी), नेपथ्य : कृष्णा हिरेमठ (उजगोबा), द्वितीय- रामेश्वरी घुंटे (झाडवाली झुंबी). रंगभूषा : प्रथम - प्रणाली बनसोडे, (दुष्काळावर करु मात), द्वितीय- ध. सु. गुजरे (आम्ही सावित्रीच्या लेकी).
उत्कृष्ट अभिनय : रौप्य पदक - ईश्वरी होनराव (आम्ही सावित्रीच्या लेकी) व श्वेता भोसले (झाडवाली झुंबी). अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र : संहिता देशमुख (एक झाड मायेचं), साक्षी कनका (निबंध), जान्हवी गोटे (बंड्या भडभडेची बडबडी बायको), सांची कांबळे (उजगोबा), श्राविका जाधव (आम्ही सावित्रीच्या लेकी), विश्वतेज भाळे (दुष्काळावर करु मात), आर्यन कनगुडे (सगळे आम्हालाच का बोलतात), नवल दौंतुल (आम्हाला गांधी व्हायचंय), प्रणव रामदासी (आम्ही नाटक करीत आहोत), साईप्रसाद नाशिककर (निबंध).