आम्हीच शिवसेना, आम्हालाच प्रचंड समर्थन; शिंदे गटाचा धनुष्यबाणावर दावा, ECला दिली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 06:05 AM2022-10-07T06:05:23+5:302022-10-07T06:06:03+5:30

कोणाकोणाचा आपल्याला पाठिंबा आहे याची आकडेवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सादर केली आहे.

we are shiv sena we have huge support shinde group claim on symbol figures given to ec | आम्हीच शिवसेना, आम्हालाच प्रचंड समर्थन; शिंदे गटाचा धनुष्यबाणावर दावा, ECला दिली आकडेवारी

आम्हीच शिवसेना, आम्हालाच प्रचंड समर्थन; शिंदे गटाचा धनुष्यबाणावर दावा, ECला दिली आकडेवारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेत आमदार, खासदारच नव्हे, तर  प्राथमिक सदस्यांपासून कोणाकोणाचा आपल्याला पाठिंबा आहे याची आकडेवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर एका याचिकेद्वारे सादर केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यांचा, तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा नसतानाही अंधेरी (पूर्व) मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत बेकायदा शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आपल्या गटाच्या वतीने उमेदवारी दाखल करीत आहेत. त्यामुळे निवडणूक चिन्हाबाबत असलेला वाद निवडणूक आयोगाने तातडीने सुनावणीस घेऊन त्यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका याचिकेद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

ठाकरे यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यांचा पाठिंबा नसल्यानेच निवडणूक आयोगाने पुरेशी कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटीस काढूनही वारंवार मुदत वाढवून मागत आहेत. पक्षाबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, न्यायालयानेही निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला कोणत्याही प्रकारची स्थगिती दिली नाही. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता आयोगाने लवकरात लवकर पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा याचिकाकर्त्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.

ठाकरे गट आज कागदपत्रे सादर करणार

- निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर हक्क सांगण्यासाठी शिवसेना आज, शुक्रवारी प्रतिज्ञापत्रे व पुरवणी कागदपत्रे निवडणूक आयोगापुढे सादर करणार आहे.  ठाकरे गटाला ७ ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली आहे. आयोगाने ठाकरे गटाला २३ सप्टेंबरपर्यंत लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे व इतर संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. 

- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा  हवाला देऊन यासाठी एक महिन्याची मुदतवाढ शिवसेनेने मागितली होती. परंतु, आयोगाने ७ ऑक्टोबरची मुदत दिली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख १४ ऑक्टोबर आहे. त्यापूर्वी धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचा निकाल लागेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: we are shiv sena we have huge support shinde group claim on symbol figures given to ec

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.