आम्हीच सर्वांत मोठा पक्ष, सर्व पक्षांचे दावे-प्रतिदावे, भाजप-शिंदे गटावर मात केल्याचा मविआचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 05:49 AM2022-12-21T05:49:27+5:302022-12-21T05:49:56+5:30

राज्यातील ७,६८२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले.

We are the biggest party claims counter claims of all parties mahavikas aghadi claim of defeating BJP Shinde group grampanchayat election | आम्हीच सर्वांत मोठा पक्ष, सर्व पक्षांचे दावे-प्रतिदावे, भाजप-शिंदे गटावर मात केल्याचा मविआचा दावा

आम्हीच सर्वांत मोठा पक्ष, सर्व पक्षांचे दावे-प्रतिदावे, भाजप-शिंदे गटावर मात केल्याचा मविआचा दावा

googlenewsNext

राज्यातील ७,६८२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढविली गेली नसली तरी विजयानंतर सर्वच पक्षांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे भाजपने क्रमांक एकच्या जागा पटकाविल्याचे चित्र आहे.

आकडेवारीनुसार तसेच निवडून आलेल्यांनी कोणत्या पक्षाशी निष्ठा जाहीर केली आहे, हे लक्षात घेता भाजप क्रमांक एकवर, राष्ट्रवादी क्रमांक दोनवर, काँग्रेस तीनवर, शिवसेना (बाळासाहेबांची) चौथ्या तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाचव्या क्रमांकावर आहे. भाजप आणि शिंदे गटाने मिळविलेल्या जागांची एकत्रित संख्या मविआतील तीन पक्षांची बेरीज करूनही जास्त असल्याचे वृत्त विविध चॅनेलने दिले आहे. मविआच्या नेत्यांनी मात्र आम्ही भाजप-शिंदे गटावर मात केल्याचा दावा केला आहे.

छगन भुजबळ यांना नाशिक जिल्ह्यात मोठा धक्का पोहोचला आहे. त्यांनी पुरस्कृत केलेल्या सातपैकी फक्त एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीला यश मिळवता आले आहे. सहा ग्रामपंचायती शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात गेल्या आहेत. आ. गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री हिराबाई पडळकर आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीत सरपंचपदी निवडून आल्या आहेत.

२१ व्या वर्षीच कारभाराची धुरा 
लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातील शिंदगी (खु.) व मांगदरी ग्रुप ग्रामपंचायतीसाठी भाजपच्या दोन गटांत अटीतटीची लढत झाली. गावातील नागरिकांनी नव्या चेहऱ्यांना संधी देत बीए तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या २१ वर्षे चार महिने पूर्ण केलेल्या संगमेश्वर सोडगीर याच्या गळ्यात सरपंचपदाची माळ घातली आहे. तर अकोलामध्ये २१ वर्षीय प्रिया सराटे सरपंचपदी निवडून आली आहे. ती काँग्रेस पुरस्कृत उमेदवार होती.

जळगावात दगडफेक; एक मृत्यू 
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात टाकळी येथे निवडणुकीत पराभूत गटाकडून देवदर्शनासाठी मंदिराकडे निघालेल्या विजयी उमेदवार व समर्थकांवर जोरदार दगडफेक झाली. यात दोन जखमी झाले. बेशुद्ध झालेल्या धनराज श्रीराम माळी (३२) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ६६ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर सायंकाळी ५४ जणांना ताब्यात घेतले आहे.

विखे पाटलांचा थोरातांना धक्का
बाळासाहेब थोरातांचे मूळगाव असलेले जोर्वे, तळेगाव दिघे, घुलेवाडी, नीळवंड, निंभाळे, कोल्हेवाडी येथे विखे पाटलांचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर निमगाव जाळी, उंबरी-बाळापूर येथे थोरातांनी विखे पाटलांना धक्का दिला आहे.

गेल्या निवडणुकीपेक्षा युतीचा यावेळी दुप्पट मतांनी विजय झाला. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आमचे सर्व आमदार-कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली. त्यांचे आभार मानतो.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीला दणदणीत विजय मिळाला आहे. आतापर्यंत जे आकडे आलेले आहेत, त्यानुसार ३ हजार २९ ग्रामपंचायतीत आम्ही विजयी झालो. 
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ग्रामीण भागात काँग्रेसची पाळेमुळे आजही घट्ट आहेत. भाजपचे विजयाचे दावे खोटे असून दुसऱ्याच्या घरी पोरगा झाला तरी भाजपवाले लाडू वाटतात. आम्हाला ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळाला आहे. 
 नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाचे यश, अपयश असे नसते. वषार्नुवर्षे हे आकडे ऐकत आहोत. यातील फोलपणा नंतर कळतो. आपला पक्ष पहिला, तुमचा दुसरा हा बालिशपणा आहे.
उद्धव ठाकरे, शिवसेना (उद्धव  बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख

सर्वांत जास्त जागा महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या आहेत. खोटे बोल पण रेटून बोल, अशी भाजपची परिस्थिती आहे. 
आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी

Web Title: We are the biggest party claims counter claims of all parties mahavikas aghadi claim of defeating BJP Shinde group grampanchayat election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.