आम्ही विधानाशी सहमत नाही, मुंबई...; राज्यपालांच्या विधानावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 01:07 PM2022-07-30T13:07:15+5:302022-07-30T13:07:40+5:30
महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणूस, मराठी उद्योजक, मराठी साहित्यिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मराठी लोकांचा सहभाग जास्त आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
धुळे - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विकासाच्या वाटचालीत मराठी माणसाचं श्रेय सर्वाधिक आहे. उद्योगाच्या क्षेत्रातही मराठी माणसाने प्रगती केली आहे. जगभरात मराठी माणसाचं नाव झालं आहे. राज्यपाल काय बोलले त्याबाबत ते खुलासा करतील परंतु आम्ही राज्यपालांच्या विधानाशी सहमत नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.
धुळ्यात पत्रकारांना त्यांनी राज्यपालांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, गुजराती, मारवाडी इतर समाज असेल वेगवेगळ्या समाजाचं योगदान नाकारता येणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणूस, मराठी उद्योजक, मराठी साहित्यिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मराठी लोकांचा सहभाग जास्त आहे.एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अतिशोयोक्ती वापरली जाते. तसेच राज्यपाल बोलले असेल. या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात मराठी माणसाचं योगदान सर्वाधिक आहे हे राज्यपालांनाही माहिती आहे असं त्यांनी सांगितले.
राज्यपालांचा खुलासा
मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला,” असं राज्यपाल म्हणाले. काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नसल्याचं खुलासा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला आहे.
राज ठाकरेंचा इशारा
‘मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो,’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी इशारा दिला आहे.