छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही, संजय राऊतांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 10:54 AM2020-01-16T10:54:01+5:302020-01-16T11:10:48+5:30
जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आले तेव्हा त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याची भूमिका शिवसेनेने बजावली आहे.
मुंबई - आमच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाद्यांबाबत नेहमीच आदराची भावना राहिली आहे. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आले तेव्हा त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याची भूमिका शिवसेनेने बजावली आहे. त्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महारांजांबद्दल ज्ञान देण्याची गरज नाही, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी उदयनराजेंना लगावला आहे.
उदयनराजेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेनंतर संजय राऊत यांनी उदयनराजेंनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत, असे विधान केले होते. त्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, ''छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आणि देशाचे नव्हे तर विश्वाचे दैवत आहे. आम्हाला शिवरायांबाबत सार्थ अभिमान आहे. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे तेव्हा त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याची भूमिका शिवसेनेने बजावली आहे. त्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महारांजांबद्दल ज्ञान देण्याची गरज नाही.''
'आमचे सरकार म्हणजे ‘सुपरहिट’ सिनेमा; मी कोणाला घाबरत नाही, हिंमत असेल तर समोर या'
शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या; संजय राऊतांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर
मी दाऊदशी बोललोय, त्याला दमही दिलाय, संजय राऊत यांनी उघड केले गुपित
''छत्रपतींच्या गाद्यांबाबत आमच्या मनात नेहमीच आदराची भावना राहिली आहे. शिवरायांचे वंशज असलेल्या शिवेंद्र राजे आणि संभाजीराजेंबद्दल आमच्या मनात कायम आदर राहिला आहे. कोल्हापूरचे सध्याचे छत्रपती शाहू महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे या शिवसेनेमध्ये होत्या, शिवसेनेकडून त्यांनी निवडणुकही लढवली होती. अशाप्रकारे शिवरायांच्या वारसदारांचा शिवसेनेशी संबंध राहिला आहे.''असेही राऊत यांनी सांगितले.
काही विषयांवरून काही जाणांनी वादाला तोंड फोडले. त्यामुळे आम्हाला प्रतिक्रिया द्यावी लागली. तुम्ही शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक यांच्याबाबत काहीही बोलाल, हे कसे काय खपवून घेतले जाईल. आम्ही तुमचा आदर राखतो. तुम्हीही आमचा आदर राखा. देशात लोकशाही आहे, येथे तंगड्या तोडण्याची भाषा योग्य नाही, असा टोलाही त्यांनी उदयनराजेंना लगावला.