"आम्ही काही कच्च्या गुरूचे चेले नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 03:21 AM2018-12-02T03:21:10+5:302018-12-02T03:21:24+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ डिसेंबरच्या आत आरक्षण देण्याचा शब्द दिला होता.
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ डिसेंबरच्या आत आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. ३० नोव्हेंबरला रात्री राज्यपालांची सही झाली. रात्री प्रिंटिंग प्रेस सुरू ठेवली आणि शनिवारी सकाळी सहाच्या आत या आरक्षणाचे गॅझेट निघाले. आम्ही कच्च्या गुरूचे चेले नाही, अशा शब्दांत पालकमंत्री आणि आरक्षणविषयक नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा दोन दिवसांचा प्रवास शनिवारी उलगडला.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून परिश्रम घेतलेल्या चंद्रकांत पाटील यांचे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास खास विमानाने विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर साडेचारच्या सुमारास त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
मिरवणुकीच्या समाप्तीवेळी ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये मंत्री पाटील म्हणाले, आमदार, मंत्री झाल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद मला शुक्रवारी झाला. १९६८ पासून अनेक चर्चा, बैठका, मोर्चे झाले; परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळाले नव्हते. ते आमच्या सरकारने दिले. यापुढील काळात धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजालाही कायद्यातील तरतुदीनुसार आरक्षण देण्यात येईल. या आरक्षणामुळे एकीकडे मराठा समाजातील तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत; तर दुसरीकडे शिक्षणाचे प्रमाणही वाढणार आहे.
>मंत्री पाटील यांनी दिल्या घोषणा
उघड्या जीपमध्ये बसल्यानंतर मंत्री पाटील यांनी हातामध्ये भाजपचा झेंडा घेऊन घोषणा दिल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे भरते आले.
>हे आरक्षण कायद्याने टिकणारे आहे. कायद्यातील स्वल्पविराम आणि पूर्णविरामांचाही ज्येष्ठ वकिलांनी अभ्यास केला आहे. यातूनही काहीजण कोर्टात जाणार आहेत. त्यांना अंबाबाई सद्बुद्धी देवो! कुणाचेही काही काढून न घेता हे आरक्षण दिले आहे. तरीही आम्ही खूप तयारी केली आहे. मी सगळे पत्ते खुले करीत नाही.
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर