‘हम करे सो कायदा’ फार काळ टिकत नाही
By Admin | Published: January 22, 2017 04:44 AM2017-01-22T04:44:01+5:302017-01-22T04:50:28+5:30
भाजपा सरकार आल्यापासून असहिष्णुतेचा मुद्दा पुढे आला. यावरुन अनेकांनी पुरस्कार परत केले. स्वत:चाच चेहरा कसा पुढे येईल, मीच लोकांपुढे गेलो पाहिजे, असा केविलवाना प्रयत्न
पिंपरी : भाजपा सरकार आल्यापासून असहिष्णुतेचा मुद्दा पुढे आला. यावरुन अनेकांनी पुरस्कार परत केले. स्वत:चाच चेहरा कसा पुढे येईल, मीच लोकांपुढे गेलो पाहिजे, असा केविलवाना प्रयत्न पंतप्रधान करीत आहेत. अशी भुमिका गेल्या सत्तर वर्षात इतर कुठल्याही पंतप्रधानांनी घेतली नव्हती. हम करे सो कायदा, मी करेल तीच पूर्वदिशा, ही भुमिका घेणारे फार काळ टिकत नसतात. हिटलर, सद्दाम हुसेन यांना कधी यश आले नाही. ते अपयशीच झाले. खरे काय अन् खोटे काय, हे समोर आल्यावर सर्व स्पष्ट होते. अशा राजकारणापासून सावध राहायला हवे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी थेरगाव येथे केले.
शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रसच्या वतीने थेरगाव येथे आयोजित मेळाव्यात पवार बोलत होते. महापौर शकुंतला धराडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती डब्बू आसवानी, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, शिक्षणात मक्तेदारी निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न भाजपा सरकारकडून सुरु आहे. तर आरएसएसचे लोक आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य करतात, असे त्यांच्या मनात येतेच कसा? या सरकारची भुमिका कामगारविरोधी तसेच सर्वधर्मसमभावाची नसून मनुवादी व मूठभर लोकांचा विचार करणारी आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रसच्या पदाधिकारयांनी जबाबदारीने वागायला हवे. एखाद्या महाविद्यालयात गेल्यास ‘लाईनी’ मारायच्या भानगडीत पडू नका, तसे काही करायचे असेल तर आधी करुन घ्या अन् मग संघटनेत नेमणुका देतो, असे पवार यांनी नमूद करताच हशा पिकला. आम्हीपण तुमच्या काळामधून गेलेलो आहे.महाविद्यालयीन जीवनाचा आनंद घेतला अन् त्यानंतर जबाबदारी घेतलेली आहे. तुम्हीही सामंजस्याने वागा, असा सल्ला पवार यांनी दिला.