राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला महत्व देत नाहीत; कर्नाटकच्या निकालावरुन भाजपचे ठाकरेंना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 07:06 PM2023-05-14T19:06:24+5:302023-05-14T20:39:54+5:30
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती.
मुंबई: शनिवारी(दि.13) कर्नाटक निवडणुकीचा निकाल लागला. यात काँग्रेसकडून भाजपचा दारुण पराभव करण्यात आला. काँग्रेसने 136 तर भाजपने फक्त 65 जागा जिंकल्या. या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी भाजपचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असल्याची टीका केली होती. त्यांच्या टीकेला आता भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, 'कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव असेल, तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव का झाला? उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही भाजपाला घवघवीत यश मिळालं, तिथे ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव नव्हता का? यावर राज ठाकरे बोलतील का?''
“राज ठाकरे हे केवळ स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी प्रतिक्रिया देतात. घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. आम्ही त्यांच्या प्रतिक्रियेला फार महत्त्व देत नाही,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
काय म्हणाले होते राज ठाकरे ?
आपलं कोण वाकडं करू शकतो अशा विचाराचा जो असतो त्याचा हा पराभव आहे. जनतेला, लोकांना कधीही गृहित धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा. मी मागे माझ्या भाषणात म्हटलं होतं की, विरोधी पक्ष हा जिंकत नसतो, तर सत्ताधारी हरत असतात. मला वाटतं हा पराभव स्वभावाचा पराभव आहे, वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करू शकतो अशा विचाराचा जो असतो त्याचा हा पराभव आहे, असं मला वाटतं, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती.